
तिच्या प्रेमाचा लालबूंद रंग
माझ्या मनात दररोज धूराळा खेळायचा.
तिला बघितल्यावर माझ्या ह्रदयाचा ठोका
न्यारीच ताल धरायचा.
माझ्या मनातलं सारं तिला सांगण्याची
माझी हिम्मत कधी झाली नाही
माझ्या डोळ्यातून कळतही होतं तिला
प्रेम माझ्या मनातलं
पण तरीही ती कधी काही बोलली नाही.
तीच्या ओठांतला हा अबोल नखरा
मला रोजच छळायचा
तिच्या प्रेमाचा लालबूंद रंग
माझ्या मनात दररोज धूराळा खेळायचा.
असच होतं माझं तिच्यावरचं प्रेम.
फॅन्ड्रितल्या जब्या सारखं
सुर्यासारखं प्रखर
पण मावळतीला गेल्या सारखं
मग म्हंटल तिच्या समोर मनातून एकदा व्यक्त व्हावं
भारावलेलं मन एकदा तिच्या समोर रीतं करावं
धावत्याला बांध घालणे ही रितच असते जगाची
मी क्षणभर विसरून गेलो होतो जात तिची न् माझी
माझ्या मनात हा जातीचा वणवा
गुलाबी होऊन जळायचा
तिच्या प्रेमाचा लालबूंद रंग
माझ्या मनात दररोज धूराळा खेळायचा.
मी अंधारातला काजवा, तीची जात चांदण्याची
तिच्या माझ्या सोबतीला, साथ फक्त काळोखाची
तिला म्हंटल आभाळातला चंद्र एकदा होऊन बघ
वाटेल तुला आभाळ ठेंगण मिठीत एकदा येऊन बघ
ती नुसतीच हसली, हसत हसत निघून गेली
जाता जाता म्हंटली
राजा इतकीच वाटते खंत
तुझ्या प्रेमाहून खूप मोठीय रे ही जातीची भिंत!
तिच्या जातीपाई नकाराने रोजच जीव जळायचा
तरी तिच्या प्रेमाचा लालबूंद रंग
माझ्या मनात दररोज धूराळा खेळायचा.
– जीवन सोनवणे