धर्म समजून घेताना….. 

मी मयुरी, गेल्या  २१ वर्षात मी स्वतः ला व इतरांना मी हिंदू धर्माची आहे, असं कधी अभिमानाने सांगावं असं कधी वाटलंच नाही. कारण “धर्म” हा शब्द ऐकताच माझ्या समोर विषमतेचे, अन्यायाचे आणि वर्चस्वाचे दृश्य  येते. मुळात म्हणजे धर्म हा फक्त लोकांनी आपल्या सोई साठी व ठराविक सत्तेसाठी रुजू केला आहे .  आपल्या प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात धर्म हा प्रत्येक ठिकाणी भूमिका निभावताना दिसतो, ज्याचा प्रत्येकाच्या मानसिकतेवर परिणाम होत असतो . मग तो काहींना चांगला वाटतो तर काहींना वाईट वाटतो.  माझ्या ११ वी  व १२ वी च्या शैक्षणिक वर्षात माझी काही मुलींशी मैत्री झाली व काही कालावधी नंतर आम्ही जिवलग मैत्रिणी झालो .

एक दिवस सहज एका नातेवाईकाने घरच्यांसमोर मला प्रश्न केला, “मयुरी तुझ्या मैत्रिणी कोण आहेत गं” ? त्या बद्दल मी उत्तर दिलं, “आपल्या शेजारच्या बौद्धवाडीतील आहेत माझ्या काही खास मैत्रिणी”. त्यावर नातेवाईकांची प्रतिक्रिया अशी होती कि, ठीक आहे पण एक कायमच लक्षात ठेव ,”त्या तुझ्या मैत्रिणी आहेत खर पण त्यांच्या घरातलं काहीच खाऊ नको! आपल्या जातीत बौद्धांचं व मुसलमानांचं काही खाल्लं जात नाही”  पहिले तर आम्ही त्यांच्या घरी जाण्यास नको वाटायचं म्हणून जरा नियमात.  मी पुन्हा त्यांना प्रतिप्रश्न केला, कि का असं? ती तर आपल्या सारखीच माणसं आहेत आणि त्याच्या मागचं कोणतं ठराविक कारण माहित असेल तर सांगा मला? त्यावर त्यांचं उत्तर असं होत कि “ते काही माहित नाही आम्हाला! पण आपल्या जातीत व आपल्या पूर्वजांनी सांगितले म्हणून ते नियम पाळायचे बाकी काही नाही”. या कटू अनुभवावरून मला असे जाणवले कि, लोकांना जात- धर्म याबाबत मुळात वैज्ञानिक सत्य माहीतच नसते. फक्त नियमांचे पालन नाही केले तर त्याने पाप घडेल या दृष्टिकोणाने अंध – विश्वास ठेवला जातो, ज्याने त्यांच्या स्वातंत्र्य साठी अढथळा निर्माण करतो व गुलामगिरीला प्रोत्साहन देते.

दुसरा अनुभव ज्याने मला धर्म किती आणि कश्या पद्धतीने आपण कळत व नकळत पाळतो याची लागलेली ठेच! ती म्हणजे;  १३ वी ला शैक्षणिक वर्गात असताना चा हा छोटासा प्रसंग. माझ्या दोन मैत्रिणी जिवलग तसेच मुस्लिम धर्माच्या. आम्ही रोज वर्गात सर्व काही एकत्र करायचो अभ्यास ,बाहेर फिरणं , दुपारचं जेवण आणि एकमेकांना आपला डब्बा शेअर करण्याची एक वेगळीच मज्जा. मात्र एक दिवस माझ्या जिवलग मुस्लिम मैत्रिणींनी त्यांच्या डब्यात बैलाचं मटण आणलेले. आज जेवणाची वेळ झाली, आम्ही एकत्र बसलो खरं ! पण काही वेळाने माझी जिवलग मैत्रीण बोलली “मयुरी तुम्ही आज आमच्या सोबत नका जेऊ”.  मी थोडे विचारात पडले हे काय नवीन आता?  त्यावर ती म्हणाली , “अगं असंच नाही सांगू शकत तुला “.  मी  म्हंटल  “असं थोडीना असत रोज एकत्र जेवण करतो , मग आज असं कोणतं कारण कि तुम्ही दोघी वेगळीकडे जेवत आहात”.  तेव्हा तिने कोड्यात मला सांगितलं, अगं  “आज आम्ही डब्या मध्ये जे आणलेलं आहे ना ते तुम्ही लोक नाही खात “. मला समजत नव्हते. मी तिला जरा चिडूनच बोलले , “हे काय नवीन तुझं, ‘तुम्ही लोक म्हणझे ‘  मी तर मयुरी आहे ना, तुझी मैत्रीण!  ती त्यावर म्हणाली  “अगं तस काही नाही, मला असं म्हणायचं आहे कि, ”आमच्या धर्मात आम्ही खातो ते तुम्ही नाही खात”. मी शेवटचं विचारते ,सांग नक्की काय आहे तुझ्या जेवणात आज?  त्यावर तिने नाईलाजाने सांगितले “मोठ्याच मटण ”  म्हणजे बैलाचं . …….. …….  ५ मिनिट मी शांतच राहिले … मला काहीच प्रतिक्रिया तिला देता नाही आली . तसेच दबक्या आवाजात तिला बोलले , ook , बरं जा जेवण कर तू .  आणि तिथून निघून आले .

अनेक विचार येऊ लागले, बैलाचे मटण खाणे  चुकीचे असते, पाप असत, आपल्या धर्मात असंच सांगितलं जात . थोड्या वेळा साठी  न जाणे का पण  अपराधी वाटू लागलं .  मी वेळ घेतला . खूप विचार केला . कारण अश्या व्यक्तींच्या सानिध्यात मी असेन अशी कधी कल्पनाही केली नव्हती . मी स्वतः लाच प्रश्न विचारण्यास सुरुवात केली . मयुरी , तू नक्की ज्या धर्माचा विचार करतेस ते काय आणि कश्यासाठी आहे कोणी बनवलं हे तरी माहित आहे का तुला ?  जसे  मुस्लिम धर्मात डुक्कर ला देव मानून डुक्कर खाल्ले जात नाही.  तसेच हिंदू धर्मात हि बैलाला देव मानलं जात व खात नाही . पण या साठी एकमेकांच्या धर्माला वाईट दर्शवून व त्याचा द्वेष करून आपण माणुसकी विसरायची का ? तुमची मैत्री हि कोणत्या धर्माच्या आधारावर नाही झाली. ती तर प्रेम, आपुलकी , जिव्हाळा या मूल्यांच्या आधारावर झाली आहे. आणि प्रत्येक व्यक्तीला तिला हवं तस जगण्याचा संपूर्ण स्वतंत्र आहे, आणि कोणत्या नियमांच्या आधारावर कोणाच स्वतंत्र हिरावून घेणं चुकीचं आहे असा संवाद स्वतःशी चालू होता.

नंतर मी स्वतःलाच  म्हणाले ” चल उठ निराश होऊ नकोस ,  ह्या प्रसंगाने तुला जी मनाला ठेच लागली त्याने तुला इतकं तरी समजले ना कि भले हि तू धर्म मानत नाहीस मात्र अप्रत्यक्ष रित्या कुठे तरी धर्माचे नियम हे मनात बिंबवल्याची जाणीव झाली. आणि तुला यातून शिकायला मिळाले. धर्माच्या नियमांच्या आधारावर तुमची मैत्री झाली असती तर कदाचित तुम्ही चांगल्या मैत्रिणी कधीच होऊ शकला नसतात . एकमेकांच्या मनात भीती , किंवा अथवा अविश्वास असता . मात्र हि मैत्री माणुसकीच्या. प्रेमाच्या  व जिव्हाळ्याच्या आधारावर झाल्याने ती एक पवित्र , नि: स्वार्थी व समतेच्या मार्गावर चालणारी होऊ शकली.

 

मी तसेच उठले, स्मित हास्य चेहऱ्यावर आणलं आणि माझ्या मुस्लिम मैत्रिणीला मिठी मारून  सहजच आभार मानले . कदाचित असा अनुभव मला नसता आला तर माझ्या मनात दडलेलं व बिंबवलेले  धर्म बाबतचे नियम व अटींची जाणीव झाली नसती व आंधळेपणाने दुसऱ्या धर्मा बद्दल द्वेष अप्रत्यक्ष राहिला असता.

आपल्या देशात अनेक धर्म  आहेत. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख , जैन, बौद्ध ,पारसी आणि प्रत्येक धर्माचे काही नियम व अटी विचारधारा असते.  ज्याने समाजात अनेक दंगली ,  द्वेष व वादविवाद हा चालू असतो.  आमचा धर्म श्रेष्ठ तुमचा तुच्छ ! या मुद्द्याला घेऊन होत असतो . मात्र मला समजलेला धर्म या पेक्षा वेगळा आहे . “धर्म म्हणजे अशी विचारधारा जी सर्वाना आपले विचार , अभिव्यक्ती स्वातंत्र , एकता , बंधुता , प्रेम, जिव्हाळा या मूल्यांच्या आधारावर एक असा समाज बनवेल जिथे  द्वेष नाही आपुलकी असेल, जिथे तुझं माझं असं नाही तर आपण अशी भावना असेल,  जिथे भीती नाही तर मोकळा श्वास असेल,  जिथे स्वार्थ नाही तर माणुसकी व ममता असेल”. असा धर्म आपण सर्वानी स्थापन करू या तो म्हणजे मानवता धर्म. अश्या प्रकारे धर्माचा कळत व नकळत हा प्रभाव कुटुंब, शेजारी, समाज, मित्र – मैत्रिणी , ठराविक संस्था यांच्या तर्फे पडत असतो . खरंतर यात कोणाची चुकी नसते मात्र अश्या धर्माच समर्थन  व स्थापन करावे  ज्यात आपल्याला नियम व अटी नाही तर स्वातंत्र ,समता , बंधुता च्या मार्गाने माणुसकीचा मार्ग सापडेल . मला धर्म समजून घेताना … “धर्म हे आपल्या  मानसिकतेत व विचारधारेत असतो हे समजले. कारण आपले विचार जर मानवतावादी असतील तर मानवता धर्म निर्माण होण्यास वेळ लागणार नाही” .

 

मयूरी लाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *