
“धर्माविणा तरणोपाय नाही”, तर दुसरीकडे ”धर्म म्हणजे अफूची गोळी आहे”. भारताला धर्म, धार्मिक श्रद्धा आणि प्रथा या विविधतेने ओळखले जाते. भारतातील धर्मनिरपेक्षतेचा अर्थ म्हणजे राष्ट्र हे निधर्मी आहे तसेच राष्ट्रासाठी सर्व धर्म समान आहे. १९७६ सालच्या ४२ व्या घटना दुरुस्तीच्या कायद्यानुसार भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे.
“ईश्वरी इच्छा” हाच कायदा या सिध्दांताच्या आधारे, धर्मशास्त्र सांगणा-या पवित्र ग्रंथाच्या आधारावर शासन चालवणारे राज्य हे धर्मसत्ताक किंवा धर्मशाही होय. अधिकृत धर्माचे रक्षण व प्रसार करणे हे या राज्याचे प्रमुख कर्तव्य मानले जाते. भारतात जवळ – जवळ सात ते आठ धर्माचे लोक राहतात. (जैन, बौद्ध, ख्रिश्चन, मुस्लिम, हिंदू, पारशी, शीख) धर्म जो सांगतो तेच खरं आहे म्हणणारे शिक्षित असून अशिक्षित सारखे वागणारे या भारतात खूप लोक राहतात. धर्माचे ठेकेदार मात्र स्वतःच सर्व निर्णय घेत असतात. देव, भगवान, अल्ला, गॉड, अहुर मज्द, अशा अनेक देवाच्या नावाने तसेच धर्माच्या नावावर बाजारीकरण होत असल्याचे मला दिसून येत आहे. प्रत्येक धर्माचे ठेकेदार आपला धर्म कसा वाढेल याकडे पूर्णतः लक्ष देत आहेत.
दर सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आरत्या. दिवसातून पाच नमाज व महिन्यातून चार नमाज पाडण्याचा हट्ट. आठवड्यातून एकदा चर्च मध्ये प्रार्थनेसाठी जाणे व बौद्ध धर्माचे लोक सांगतात कमीत कमी आठवड्यात विहारात एकत्र येऊन सुत्त पठण, महापरित्राण पाठ, बुद्ध वंदना करा. एवढच काय तर गणपती येण्यापूर्वी १५ दिवस तयारी, दहिहंडी येण्यापूर्वी महिनाभर सराव, आला मोहरम त्याची १५ दिवस तयारी, आला ख्रिसमस १५ दिवस तयारी, आली बुद्ध पौर्णिमा १५ दिवस तयारी.
मला आलेले तीन अनुभव, मी आपल्या सर्वां समोर मांडत आहे. २०१५ साली आमच्या “सम्यक” सामाजिक गटाची स्थापना झाली. सम्यकच्या साथिनी एका पडक्या मंदिरात १ ली ते १० वी च्या विद्यार्थांसाठी अभ्यासिका चालू केली. ते मंदिर बांबू आणि प्लास्टिकच्या कागदाचं होत. आम्ही मुलांची मोफत शिकवणी घेत होतो. मस्त सुरळीत चाललं होत. अचानक काही लोक नशा करून येतात . आणि म्हणतात, “ जे काय तुम्ही शिकविणीचं दुकान चालू केलय ते बंद करा” आमची येथे भजनाची जागा आहे. आम्ही येते दर वर्षी गोंधळ घालतो, हे उदगार ऐकून समजलं ते आज धर्माची दादागिरी दाखवत आहेत.
२०१६ साली असचं वस्ती मध्ये जागा शोधतं होतो, बऱ्याच लोकांना जागेसाठी विचारलं. पण कोणीही अभ्यासिकेसाठी जागा देण्यासाठी तयार नव्हते. त्यावेळी एका सोसायटीला भेटलो. त्या सोसायटीचे कार्यकर्ते आम्हाला बोलले की, “गणपती नंतर तुम्हाला भाड्याने जागा देऊ, मी सहज विचारलं ! काका असं का? गणपतीला अजून २ महिने आहेत, तो पर्यत आम्ही खूप काही शिकवू शकतो. ते बोलंले “आधी आमचा गणपती मग तुमची शिकवणी” हे एकूण पुन्हा वाईट वाटलं. धर्माच्या ठेकेदारांनी पुन्हा कसे गुलामगिरीकडे समाजाला घेऊन जाण्याचा प्रयत्न धर्माचे लोक करत आहेत. हे दिसून आले !
२०१७ साली आम्ही नगराच्या अध्यक्षांना भेटलो आणि बोललो कि, आम्हाला बाबासाहेबांचं भवन (विहार) शिकवणीसाठी द्या. असे पण ते बंद कुलुपात आहे. त्यांनी ही नकार दर्शवला. त्यांचे मत होत तुम्ही शिकवणी घ्याल पण तेथे बाबासाहेबांची मूर्ती आहे, त्याची कुणी विटंबना केली तर ! त्यात काय घडलं तर ! ते फक्त बुद्ध वंदना, १४ एप्रिल आणि गणपती बसवण्यासाठी आहे. या वेळेस खूप वाईट वाटलं डॉ.बाबासाहेबांनी सांगितलं होत कि शिका… संघटीत व्हा… आणि संघर्ष करा… अशा महामानवाच्या नावावर भवन, विहार बंद कुलुपात ठेवली जातात. आणि तेथे धर्म वाढवण्याचे कार्य केले जाते. खरच किती लज्जास्पद गोष्ट आहे !
धर्म हे धर्मामध्ये शर्यत आणि युद्ध लावण्याचा कार्य करत आहे. आपला भारत कोणत्याही धर्मावर चालत नसून तो भारतीय संविधानावर चालत आहे. आपल्या मुलांना संविधान समजावलं पाहिजे. तरी धर्म शिकविले जातात. आपण जर उथळ धर्म शिकविण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा भारत गुलामीकडे नक्कीच जाणार आहे. जर आपण सर्व धर्मांचं मर्म असणारं भारतीय संविधान शिकविण्याची भूमिका घेतली, तर आपल्या देशातील प्रत्येक व्यक्ती मध्ये सुजाण आणि सुजक नागरिक घडेल.
~ योगेश राजेश्री रामचंद्र बोले
(सीपीडी साथी)