तुम्ही धर्मनिरपेक्षित झालात का ???

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंदिरे उघडी करण्याकरिता एक वक्तव्य केले आणि म्हणाले, ‘तुम्ही धर्मनिरपेक्षित (SECULAR) झालात का?‘ सुरुवातीला असे ऐकून हसू आले आणि मनाला वाटलं, ‘अरे हा माणूस स्वतःला अजून सेक्युलर समजतच नाही का? आणि नसेल समजत तर ठिक आहे. पण मग हा ह्या पदावर काय करत आहे. आणि नक्कीच हा प्रश्न तुम्हा सर्वांना पडला असेल.

सन १९७६ साली इंदिरा गांधी यांनी  ४२ वी घटनादुरुस्ती करून ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द भारतीय संविधानाच्या उद्देशिके मध्ये आणला. एकंदरीत धर्मनिरपेक्ष म्हणजे काय?  तर देशाचा आणि राज्याचा स्वतःचा कोणताही धर्म नसेल. भारतातील सर्व नागरिकांना समान वागणूक दिली जाईल आणि यात त्यांचा धर्म अथवा जात पहिली जाणार नाही. पण तरीही आपले प्रतिनिधी हे स्वतःच्या अथवा कोणत्या ना कोणत्या धर्माचे प्रतिनिधित्व करताना पाहायला येते. यात भाजप सारखा राष्ट्रीय पक्ष असो, अथवा शिवसेना, मनसे, एमआयएम सारखा प्रादेशिक पक्ष असो. या पक्षाचा धर्म विचारले असता आपण सहज त्यांचा धर्म बोलू आणि ते आहे.

राजकीय भुमिका स्वीकार करताना राज्यघटनेच्या प्रस्तावनेचे वाचन करून सुरुवात केली जाते आणि त्यात धर्मनिरपेक्ष या शब्दाचा उल्लेख केला जातो. राज्यपालांच्या या वक्तव्या नंतर असे वाटले की फक्त वाचना पुरते धर्मनिरपेक्ष आहे का?  प्रत्यक्ष आयुष्यात धर्मनिरपेक्षतेचा अवलंब करता का? राज्यपालाच्या  भूमिकेत असताना तुम्ही स्वतःला धर्मनिरपेक्ष समजता का? कोरोना सारखा संसर्गजन्य आजार संपूर्ण जगभरात असता अनेक निर्बंध जनसामान्यांवर लादले गेले. म्हणूनच दुकाने, शाळा, महाविद्यालये, मंदिरे, मशीद बंद ठेवण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वैयक्तिक धर्मा वरून राज्याचे निर्णय घ्यावे का? त्यांनी राज्य पहावे की प्रथम धर्म पहावा? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सेक्युलर होणे चुकीचे समजता का?

आम्ही हिंदू मुस्लिम भेद करत नाही, किंवा आम्ही हिंदू मुस्लिम असून एकत्र राहतो. म्हणजे आपण धर्मनिरपेक्ष आहोत असे नाही.माझ्या मते घटनेनुसार सर्व धर्मांना, देश आणि राज्य समान नजरेने बघणार आणि सर्व धर्मियांना समान कायदा असणार.आणि तोच कायदा चालवताना पदावरील व्यक्तीचा कोणताही धर्म नसणार. त्याचे निर्णय धर्माच्या आधारावर नसणार. प्रत्येकाला त्याच्या धर्मावरून नाही तर प्रथम नागरिक म्हणून बघितले जाणार.

तुम्ही हिंदुत्वाचा पुरस्कार करता मग तुम्ही मंदिरे का उघडत नाही. तुम्ही ‘सेक्युलर’ झालात का? – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे हे वाक्य एक मुख्यमंत्र्याला विचारणे सरस चुकीचे आहे. आणि धर्माच्या आधारावर राज्य चालवण्यास सांगणे ही  चुकीचे आहे. आणि याचा परिणाम लोकशाही वर ही होऊ शकतो. कारण जे धर्मनिरपेक्ष समजू शकले नाही ते लोकशाही काय समजतील, ते संविधान काय समजतील!

~ पूजा रुक्मिणी जालिंदर 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *