
तुझ्या श्वासातला सुगंध
देईल दरवळ संघर्षाची ,
तुझ्या ओठी येणारे शब्द
होतील गाणी लोक युद्धाची ,
सोडून लाज…
पावलावर पाऊल ठेवीत खडतर वाटेवरी ,
तुझ्या सोबतीने,मी लढेल स्वतःशी एकदा तरी…
तुझे नजरेचे तीर करतील घायाळ
माझ्या वासनेला..
कविता-गाणी आहेत
रेंगाळत तुझ्या लांब केसांवर
तू देशील समर कहानी माझ्या लेखणीला…
संस्कृतीचं थडगं पेटवशील तुझ्यासाठी रचलेल्या सरणावरी ,
तुझ्या सोबतीने, मी लढेल स्वतःशी एकदा तरी…
कमरेच्या बांधावरून मी घसरत असतो,
अंगाच्या रंगावर धसत असतो…
पण तुझ्या प्रेमाने दिलाय धडा आयुष्याचा ,
लाल नाही.. प्रेमाचा रंगही प्रेमाचाच असतो…
आता माझं तुझं भेटणं जातीच्या घाटावरी ,
तुझ्या सोबतीने,मी लढेल स्वतःशी एकदा तरी…
मी गुंतलोय, फसलोय, नकळत रडतोय,
परंपरा-धर्म-रूढी पुरुषी अहंकाराच्या गाळात…
मी माझाच नाही मी हरलोय
तुझ्या योनीतून बाहेर मला तू घेतलसं तुझ्या कुशीत..
परत घेशील का मला ?
पुरुषी मानसिकतेने रक्तबंबाळ केलेल्या पदरात…
त्रासात ही बळ देतेस तू, खळखळून हसणारी,
तुझ्या सोबतीने, मी लढेल स्वतःशी एकदा तरी…
– अजय अनिता लक्ष्मण
विभाग – नवी मुंबई