
जीवनात जसं वाटतं तसं घडतच असं नाही पण. अनेकदा असं काहीतरी घडतं जे आपल्याला अनपेक्षित असतं आणि त्यामुळे मिळणारे क्षण हे एक कटू अनुभव म्हणून कायम आयुष्यात सोबत राहतात. काही अनुभव हे गोड आठवणी देतात, तर काही अनुभव हे तितक्याच वेदना. पण या वेदनातुन केव्हातरी बाहेर पडायच असतं आणि नव्या जीवनाचं स्वागत करायचं असतं. पण तरीही या आठवणींचा कप्पा तसाच मनात घर करून राहतो. त्यामुळे त्याला किती महत्व द्यायचं हे आपल्या हातात असतं. त्याच अनुभवात न राहता, नव्याने आयुष्याकडे पाहिलं की वेदना हळू हळू कमी व्हायला लागतात. जीवनातला एक अनपेक्षित असा खूप महत्त्वाचा अनुभव तुम्हा सर्वांनाच सांगावासा वाटतोय.
शालेय प्रवास संपला आणि महाविद्यालयीन प्रवासाला सुरुवात झाली होती. 16 वर्षाची सखी आता मुक्त आयुष्याचा आनंद घेण्याच्या तयारीत हर्षाने नाचत होती. खूप आनंदी होती. तिने तिच्या आवडत्या महाविद्यालयात प्रवेश घेतला अन् तिचं आयुष्य मुक्तपणे तिने जगायला सुरुवात केली होती. त्याचदरम्यान एके दिवशी तिची ओळख संजोग नावाच्या पुरुषाशी झाली. पुरुष असा उल्लेख केला कारण त्याच वय जवळ जवळ तिच्यापेक्षा दुप्पट होतं. त्याने जेव्हा पहिल्यांदा सखी ला पाहिलं तेव्हा जणू काही त्याने तिच्यात, त्याला अपेक्षित असलेल सावज शोधलं असावं. त्याच्या नजरेतले ते वेगळे भाव नजरेतली ती विकृत भावना सखी ओळखूच शकली नाही. संजोग सखी ला कोणत्या न कोणत्या कामाच्या निमित्ताने इमारतीतचं भेटू लागला. दोघेही एकाच इमारतीत राहत असल्याने भेटणं हे रोजचं झालं होतं. संजोग हा विवाहित असल्याने आणि वयाने मोठा असल्याने सखी त्याला मामा म्हणायची. त्याला सखी तिच्या लाघवी बोलण्याने , नुकत्याच वयात आलेल्या तिच्या शरीरयष्टी मुळे खूप भावली होती . तिच्याशी जवळीक साधता यावी तिला रोज बघता यावं म्हणून संजोग सखी च्या घरच्यांशी विश्वासाचं नातं तयार करू लागला. त्याचा सर्वांसोबतचा जिव्हाळा पाहून सखी चा तिच्या मामा बद्दलचा विश्वास आणखी दृढ होत गेला. सखी विश्वासाने मामाला म्हणजेच संजोग ला तिच्या कॉलेज मधल्या मजेशीर गमतीजमती , मजेशीर किस्से , कॉलेजात येता जाता घडलेल्या घटना , तिच्या आवडी निवडी सांगू लागली. ती खूप मुक्तपणे आपल्या भावना मांडत असायची, तिच्या मनात कधीच काहीच नसायचं. हळू हळू त्यांच्यात एक विश्वासाचं नातं तयार होऊ लागलं. पण संजोग च्या मनात काहीतरी वेगळंच चाललं होतं, याची चाहूल सखी ला अजिबातच नव्हती. 1 महिना उलटल्यावर संजोग ला त्याचा मोह अनावर होऊ लागला तो सखी ला मध्ये मध्ये एकट गाठू लागला आणि चाळे करू लागला. कधी तिला रस्त्यातच मिठी मारणं, कधी गालाची जबरदस्ती पापी घेणं, हे सगळं सखी ला अजिबातचं आवडतं नव्हतं. जणू काही तिचा विश्वास तुटल्या सारखंच हे घडत होतं. तिनं हे घरी सांगायचं ठरवलं, पण सखी चे आई बाबा हळव्या मनाचे आणि आजारी असल्याने त्यांना हा धक्का सहन होईल का ? हा तर मोठा प्रश्न तिच्या समोर होताचं; पण त्याचं बरोबर आपण हे घरी सांगितल्यावर आपले कॉलेज बंद होणार तर नाही ना? हा विचार तीच्या समोर आवासून उभा होता. आणि आपल्या घरचे वातावरण तर बिघडणार नाही ना? असे प्रश्न तिच्या मनात तयार झाले.
त्यामुळे तिने या संकटाशी एकटीनेच सामना करायचं ठरवलं. तिने संजोग शी संवाद बंद करण्याचा निर्णय घेतला. तिने तिची कॉलेज ला जाण्याची वेळ आणि जाण्याचा रस्ता ही बदलला पण संजोग हा सतत इमारती खाली उभं राहून तिची वाट पाहत राहायचा तो तिचा कॉलेज ला जाण्यासाठीचा रस्ता ही थांबवू लागला. तिला जबरदस्ती बोलण्याचा प्रयत्न करू लागला. सखी काहीच न बोलल्यामुळे जबरदस्ती तिची परवानगी न घेता तिला टॅक्सी ने सोडू लागला. तिच्या सोबत वेगवेगळ्या हरकती करू लागला . 16 वर्षाच्या सखीची मानसिक स्थिती ढासळत चालली होती. तिच्या मनाची अस्वस्थता तिला कुठे व्यक्त करावी हे कळत नव्हतं. आपल्या सोबत असं घडतंय हे ती कुणालाच सांगू शकत नव्हती. एके दिवशी संजोग कॉलेजच्या गेट वर तिला दिसला. तेव्हा सखी जास्त घाबरली! तिने तिच्या मैत्रिणींना माझ्या सोबतच रहा आपण एकत्र घरी जाऊ असं म्हटलं आणि रस्ता बदलून जाण्याचा निर्णय घेतला असता संजोग ने सर्वांसमक्ष कशाचाही विचार न करता तिला अडवलं आणि “मला खूप महत्त्वाचं बोलायचंय मला माझं उत्तर मिळालं की , मी तुला अजिबात त्रास देणार नाही, त्यामुळे प्लिज थांब आणि ऐक मी काय म्हणतोय ते”. असं संजोग म्हणाला सखीच्या मैत्रिणी ह्या प्रकारामुळे भांबावल्या आणि त्या तिथून निघून गेल्या. सखी खूप रागात होती, पण आपल्या सोबत कोण नाही हे पाहून ती आतून घाबरली. कारण हे प्रकरण आता थेट कॉलेजच्या गेट पर्यंत येऊन पोहोचल होतं. तरीही तिने हिम्मत करत म्हटलं बोला. काय बोलायचं ते! संजोग म्हणाला “माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे, आणि तू मला हवी आहेस! तू फक्त माझी आहेस. तुझं माझ्यावर प्रेम आहे का ? हे मला ऎकायचंय”. सखी ला राग अनावर झाला. आणि तिने एका दमात म्हटल नाही. कधीच नाही. शी! मला खूप लाज वाटतेय ज्याला मी मामा म्हणतेय आज तो मला मिळवण्याच्या आणि माझ्यावर हक्क गाजवण्याच्या गोष्टी करतोय. सखी तिथून रागाने निघणार इतक्यात संजोग तिचा घट्ट हात पकडून आवळतो, तिला धमक्या देऊ लागतो. ह्या प्रकारा मुळे सखी खूप जास्त हतबल होते. कॉलेज च्या आवारात कोणालाही काही कळू नये म्हणुन शांत राहते. तिला कॉलेज च्या बाहेरच सगळ्या देखत संजोग उचलून टॅक्सी मध्ये फेकतो आणि टॅक्सी वाल्याला लॉज वर चा पत्ता सांगतो. सखी 16 वर्षाची पण तितकीच निरागस मुलगी. तिला कुठे आणि कशाला घेऊन चालला आहे, याची कल्पना येत नाही. टॅक्सी वाला सखी कडे उदास भावनेने पाहतो. पण त्याच्या या उदासीनतेला जास्तीचा पैसा क्षणात बदलतो.
लॉज वर घेऊन गेलेल्या ठिकाणी सखी ला संजोग सांगतो! “अजिबात आरडा ओरडा करायचा नाही. कोणी काही विचारलं की सांगायचं मी माझ्या मर्जीने इथे आली आहे. नाहीतर तुझ्या आई बापाला आज काही मी जिता सोडत नसतो.” सखीचा आई बाबांवर खूप जीव. ती हतबल होऊन जे सांगितलंय तसच वागते. संजोग तिला एका खोलीत घेऊन बेड वर जोरात आदळतो. तिला म्हणतो “आज मी तुला दाखवतो! माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. आणि ते मिळवण्यासाठी मी काय करू शकतो. तुला खूप माज आहे ना! तुझ्या छान असण्याचा, आज या सौंदर्यावर मी माझा हक्क दाखवतो”. सखी खूप विरोध करते पण संजोग काहीही ऐकत नाही. तो सखीच्या जवळ जातो आणि तिची ओढणी बाजूला सारतो. सखी त्याला विनवणी करते हे खुप चुकीचं आहे प्लिज मला सोडा. संजोग चा स्वतःवरचा ताबा सुटतो. तो सखी ला आणखी जवळ खेचनार इतक्यात संजोग ला एक फोन येतो. त्याला तो फोन महत्त्वाचा वाटतो म्हणून तो उचलतो आणि फोन वरचा समोर असलेला संजोग चा मित्र मुलीचं सील तुटलं की रक्त येईल, ती बेशुद्ध होईल, खुप महागात पडेल तुला, त्यामुळे बोंभाटा होईल. त्यामुळे तू तिथून निघ, असा त्याचा मित्र त्याला सल्ला देतो. सखी आणखी घाबरते. संजोग सखी ला जबरदस्ती चुंबन देऊन तिच्या ओठांचा चावा घेत “माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, त्यामुळे तुला काही होऊ नये म्हणून मी आज तुला काहीही न करता घरी सोडतोय, पण तू माझी आहेस हे लक्षात ठेव” असं बोलून तिला इमारती बाहेर सोडतो. तो दिवस, ती घटना , तो विकृत स्पर्श, ह्या साऱ्या गोष्टींचा सखीच्या मनावर खूप मोठा आघात होतो. तो धक्का, तो प्रसंग तिच्या जीवनाचा मोठा आणि वाईट अनुभव म्हणून तिच्या आठवणीत राहतो. ही आठवण हा धक्का पुसण्यासाठीचा आधार ती शोधत राहते पुन्हा नव्याने उभं राहण्यासाठी पण तिला त्यातून बाहेर येता येत नाही.
हा अनुभव सखी ला माणस ओळखणं शिकवून जातो. या घटनेनंतर सखी कोलमडते पण ती हिमतीनं उभ राहण्या साठी पुढे ही घटनाच तिचा आधार ठरते. या कठीण प्रसंगाला सामोरं जाण्यासाठी हा जीवनानुभव तिचा मार्गदर्शक ठरतो तो कायमचं! कारण ती जेव्हा या घटनेतून सावरते, तेव्हा ती अनेक मुलींचा आधार होते, आणि ती त्यांना लढण्यासाठी ,बोलण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी, अन्यायाला वाचा फोडण्यासाठीची प्रेरणा देत राहते. कारण ती तिच्यात या घटनेवर बोलण्याची जेव्हा हिम्मत आणते. तो वर ती व्यक्ती कायमची पसार झालेली असते. जे तिच्यासोबत घडलं ते इतर कोणासोबत घडू नये, यासाठी ती आजही तिचं काम चालूच ठेवते. कारण तो व्रण ती जखम कायम सखीच्या मनात भळभळत राहते एका कटू अनुभवासारखी…
~ ऍड. अनुराधा शोभा भगवान नारकर
विभाग-मुंबई