जग निर्माता…

प्रिय,

अण्णा…

मी मानसी, अण्णा तुम्ही मला कदाचित नाही ओळखणार पन म्या तुम्हाला आणि लहू बाबा ना ओळखते.  मी बुलढाण्यात राहते आता ७ वी ल असते. पन सोडा, जाउद्या त्या विशाले, अण्णा मा सांगायची तुम्ही अन् लहू बाबा कड लय ताकत होती. तुम्ही लयं हुशार. तुम्ही आमच्या समाजासाठी लय मोठं काम केल. तात्यान त मला तुमची कितकाली गाणी बी ऐकवलयात आणि मला बी विश्वास आहे की, तुम्हीच मला आता सारं सांगू शकाल अण्णा. आम्ही ना चिखली ला राहतो अन् आम्ही लय चांगली लोक हाय. तात्या शेती करतो अन् मा त्याले हातभार लावते. आमच्या कड १ एकरच भल मोठा शेत आहे.  सर्व लय चांगलं. पन अण्णा मला ना शाळात बाहेर बसवीत्यात ,आणि त्या दिवशी मी असच शाळा वरुण निघाले थंडीचे दिन होते, अन आमच्या कड काय तरी गावात चाललेलं. रोज सांच्याला लय मोठी माणसं वेगवेगळ्या रंगाच झेंडे घेऊन गावात बोंबलत फिरायच.  कोणी केशरी, कोणी नीळा, कोणी हिरवा, कोणी पिवळा.

 अन् तश्याच एक दिवशी शेतात ल्या पायवाटेन चालत घरा कड जात असताना पाटलाचा मोठया पोरानं माझा हात धरला.  मला लय भीती वाटली अण्णा ! म्हणून म्या हात सोडवून घराकड पळाली. तात्या न मले शेताच्या पारा वरुण पाहिल होत वाटते, ते बी मले काय झाला हे पायाले  घरी आले.  मा घरी वऱ्यानड्यातून बसून गहू साफ करत होती. मले पाहून तिले बी भ्या वाटला, अन तात्या पन मागून पळत आले. म्या सार काही मा अन तात्या ले सांगितलं. सार काही ऐकून तात्या ला धासकी भरली, तात्या घरात गेला अन् सामानाची बांध बूंद करू लागला. पण मा ने सर्व थांबवलं, मा नि एकदम भल्या मोठ्या आवाजात तात्याले अन मले सांगितलं की, “आपण कुठं बी जायचं नाय “ तेव्हा मले मा मध्ये तुम्हीच दिसलात! फक्त तुम्ही शायरी म्हणताना तुमच्या कड डफ असती अन मा कड गहू निसाच सूप व्हत मा फटकण उठली “ ताने तू घरी राह मी तुया तात्या ल घेऊन सरपंच्या कड जाऊन येते, हे गाव ही जमीन आपली बी हाय! अन् बाबासाहेबा न आपल्या साठी बी कायदा लिव्हलाय, अन आपण बी काय साद नाय अण्णाभाउच्या विचाराण पेटलेला समाज आहे. कोणी ऐकला नाय तर आपण पोलीसाकड जाऊ ”  मा चे  भले मोठ मोठे शब्द ऐकून अंगात असा संचारूनच आल की, आता रडायच नाय लढायच.तात्या अन मा गेले, सरपंच्याने  पाटलाच्या पोराला समजाऊन सांगतो अस म्हणला. 

दुसऱ्या दिवशी सांच्याला तात्या ले सरपंच्यान बोलवन धाडल. मा ले घरीच थांबाले सांगून तात्या गेला, तेवढ्यात गावतली सपकाळ काकू मा ले आवाज देयत घरा पुढं आली.  मी अन् मा अंगणताच होतो. मा नि मले घरातून पानी आनाले सांगितलं. मी आत गेले अन मागून मला त्या सांच्याला निघणाऱ्या माणसांच्या नेहमी सारख बोंबलन्याचा आवाज आला. मी पानी घेऊन अंगणात आले पण मा किवा सपकाळिण काकू  तिकड नवत्या. मले फक्त रस्त्याचे कडे ने बोंबा मारत जाणारी गर्दी दिसली. मी घराच्या अवती भवती सारा काही हुंडकुण काढला, पण मा काही घावली नाय. तात्या घरी आला तात्याचा बी हात अन तोंडाला जखमा झाल्या होत्या. मले लय भ्याव  वाटायला लागल. लय रात झाली होती.  तात्या मला घराच्या खालच्या खोलीत बंद करून मा ले शोधायला गेला. तात्या जाऊन बराच येळ झाला व्हता, मी खिडकीतून बाहेर शेता कड बघत होतो. भल्या मोठ्या अंधारात काय बी दिसत नवत, अचानक तिकडून काही मानस मले शेतात मशाली घेऊन चालताना दिसली. त्यांनी चटकी सरशी आमच्या शेताले आग लावली. हे पाहून मी कशी बशी दार खोलायचा प्रयत्न करत असताना बाहेरून कोणी तरी दार उघडला. मले वाटला मा आली बाहेर.  बघितलं तर सपकाळ काकू होत्या!  त्यांनी माया हात पकडला अन् मले घेऊन जंगल कडे पळत सुटल्या, तिकडं मी अन् त्या एक झाडावर चडून बसलो. ती लोक शेत जाळून घरा कडे आली होती. माझ साऱ्या अंगात कापरी भरली होती. म्या माया सारा जीव एकवटून माया घरा कड पाहून राहिली होती. तिकडून मी बेंल गाडी घरा पाशी येताना पायली, त्यात एक बाई अन बाप्या झोपलेला व्हता. गाडी थोडी जवळ आली, मी अजून थोडा नीट पायचा प्रयत्न केला, त्या बाई च्या अंगावर जखमा झाल्या व्हत्या, तिच्या अंगावरचे कपडे बी फाटले होते. मी अजून थोडा निरखून पाहिला तिच्या अंगावर मा ने आज घातले ली साडी व्हती… मी बाजूच्या बाप्या कड पाहिला त्याला बी खूप लागला व्हता, अन त्यांनी बी तात्या सारखा सदरा घातला व्हता… मी अजून निरखून बघणार तेवढ्यात त्यांनी आमच्या घराले आग लावली .. कागद जळत तस आमच्या घराण पेट घेतली. अजून आमच्या शेताची आग कमी पन नवती झाली, अन् ह्या साऱ्या गर्दीत मला पाटलाचा पोरगा दिसला. अन तेवढ्यात हयाणी त्या बाई अन बाप्या ला आगीत लाकडं फेकतात तसा फेकून दिल. माइ  मा… तात्या… घर… शेत… अस हाहा म्हणत जळून गेल.  तात्या मले सांगायचे अण्णा की “आपण माणूस आहोत गुलाम नाही अन आपणच ह्या जगाचे निर्माते आहोत” .. अण्णा हे कसं जग निर्माण केला व्ह आम्ही! 

तुमची,

जग निर्माता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *