जगण्याचं तुफान बळ देणारा लोकशाहीर..!

“कोऱ्या कागदांच्या हाका कानावर पडतात नि संवेदनशील माणसं लिहिती होतात..” ही गोष्ट अनेक लेखक आणि साहित्यिकांच्या बाबतीत मला नेहमीच जाणवते. आपल्याला थोर लेखक, साहित्यिकांची ओळख त्यांच्या साहित्य वाचनातून होत असते. प्रत्येक लेखकांची, साहित्यिकांची लेखनशैली वेगळी, त्याची धाटणी वेगळी, विषयाचा गाभा ही वेगळा आणि त्यांचे विचार, मतं ही वेगळी! एखाद्या लेखकाचे विचार आपल्या विचारी मनाला पटले की आपल्याला त्यांच्या साहित्यातील प्रत्येक गोष्टी मनापासून आवडू लागतात. असे अनेक थोर साहित्यिक ज्यांनी वयाच्या खूप कमी वर्षी साहित्य क्षेत्रात योगदान दिलेलं आहे. 

साहित्यातील एक शाहीर ज्यांनी आपल्या लोकभाषेतून, बोलीभाषेतून अनेक वाङ्‌मयप्रकारात साहित्यलेखन केलं. आश्चर्य या गोष्टीचं की, वयाची पुरती पन्नास वर्षे सुद्धा ते जगले नाही, शाळेचं फारसं तोंड देखील त्यांनी पाहिलं नाही आणि केवळ दीड दिवस शाळा शिकलेला माणूस ज्यांनी साहित्य लेखनात त्यांच्या जोश आणि त्वेषपूर्ण शब्दांत आपल्या लोकजीवनाचा साचा लोकांपर्यंत पोहचवण्याचं कार्य केलं ते म्हणजे लोकशाहीर साहित्यिक अण्णाभाऊ साठे..! आजपर्यंत त्यांनी केलेल्या लिखाणात मला वैविध्यपूर्ण गोष्टी जाणवल्या. तसं पाहिलं तर त्यांच्या लेखनशैलीत, विचारांत मला समाजात राहणा-या, आपल्या आजूबाजूला असणा-या लोकांच्या आयुष्यातील घटना, त्यांचं आयुष्य, त्यांची जगण्यासाठी चाललेली धडपड, त्यासाठी करावा लागणारा संघर्ष, त्यांच्या मनांची, व्यक्त न केल्या जाणा-या त्यांच्या जाणीवेची, विचारांची मुक्तपणे व्यक्त केलेली शब्दमांडणीच जाणवली. 

केवळ आपल्या छंदासाठी नव्हे तर इतरांच्या जगण्यातील धडपड, जाणीवा सांगणारं त्यांचं साहित्य मला नेहमीच एका वेगळ्याच आदर्शवादी लिखाणाकडे घेऊन जातं. आपल्या समाजातील सगळ्यात श्रेष्ठ वर्ग कुठला असं मला विचारलं तर मी सांगेन की ‘सर्वसामान्य जनता’ हा सगळ्यात श्रेष्ठ वर्ग आहे. तो कसा तर; तो निराळा आहे, तो कष्टकरी, निर्भयी, संघर्षमयी आहे. माणूस कष्टासारखे खडतर कर्म का करतो हे जोपर्यंत लेखकाला कळत नाही,  तोपर्यंत तो त्यांच्या जीवनावर साहित्य निर्माण करू शकत नाही. असे मला वाटते आणि अण्णाभाऊंच्या अनेक लोकसाहित्यात मला हे प्रकर्षाने जाणवले. एखादा लेखक साहित्यातील गुरु तेव्हाच होऊ शकतो जेव्हा तो आपल्या लेखनशैलीतल्या शब्दांना प्रत्यक्ष, जिवंतपणे जाणून  घेण्याचा प्रयत्न करतो. शोषण मुक्त समाजाचे स्वप्न पाहणा-या अण्णाभाऊ यांनी समाजात एकसुरीपणाने चालणारी व्यवस्था बदलून टाकावी यासाठी आयुष्यभर लढा दिला. शोषणमुक्ती हाच त्यांचा जणू ध्यास होता असं म्हणणं देखील वावगं ठरणार नाही. 

अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यात मला नेहमीच सत्य, विदारक आणि वर्तमानस्थिती दिसून आली. म्हणजे समाजात आपल्या समोर घडणा-या घटनांचं बारीक-सारीक तपशिलांसह केलेलं वर्णन मला दिसून आलं. त्यामुळेच त्यांच्या लिखाणात त्यांनी स्वतः आपल्या भूमीशी जोडलेली नाळ, प्रामाणिकपणा कायम आहे याची जाणीव होते. ३७ कादंब-या, १९ कथासंग्रह, १४ लोकनाट्ये, ११ पोवाडे, ३ नाटके, शेकडो गाणी, लावण्या, छकडी अशी विपुल साहित्यसंपदा निर्माण करून त्यांनी तरुणांपुढे खरंच खूप मोठा आदर्श निर्माण केला आहे. इतक्या अल्पशा आयुष्यात समाजातील भीषण वास्तव त्यांनी आपल्या साहित्यातून मांडले. 

अनुभवापेक्षा कुठला दुसरा मोठा गुरु असू शकतो का..? आयुष्यात घडणा-या घटनांची अनुभूती आणि त्यातून घडत जाणारा माणसांचा प्रवास त्यांच्या लेखनातून प्रकटपणे जाणवतो. आणि हेच प्रकटपणे मांडलेले विचार आपल्या मनाला अंतर्मुख करून जातात, विचार करायला भाग पाडतात. आयुष्य म्हणजे अव्याहतपणे चालणारा संघर्षमयी प्रवास..! या प्रवासात त्यांच्या लेखनात शृंगाराबरोबरच संघर्षाची जाण आहे आणि त्या जाणिवेबरोबरच जगण्याचं तुफान बळ देखील त्यांनी दिलेलं आहे. एखाद्या शास्त्राला गणिताचं प्रमाण असतं. विज्ञानाला सिद्धांत असतो, पुरावा असतो. पण भावनेला…? भावनेला एकच पुरावा आणि तो म्हणजे अनुभूती! आत्मानुभूती! हीच अनुभूती, जगण्यासाठी केलेला त्याग, मनांत ठेवलेली अस्वस्थता, त्याची होणारी घुसमट आणि आयुष्याचे प्राक्तन! याचं सखोल लेखन ज्यांनी केलं ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे! त्यांच्या जयंती दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम! 

~ (आर.जे. अनु) अनुजा मुळे

विभाग – अहमदनगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *