घ्वाटभर पानी…

घ्वाटभर पान्यासाठीच बाय

आता डोल्यातनं पानी काढायचं हाय…..

ह्या पल्याड आमचं गाव

अन् त्या पल्याड इरीचं नाव

दोन डोंगार उतरून धा कोस चालून

इरी म्होरं लाईन लावायची हाय

घ्वाटभर पान्या…

तशी आमच्या गावातबी इर हाय

 पर भट बामनांचा नियोम हाय

आमचं प्वार मेलं तरी

टिम्बाभर पानी बी दियाचं न्हाय

 घ्वाटभर पान्या…

आमच्या डोंगराखाली सरकारचं मोठं धरान हाय

धरणाच्या पान्याखाली आमची बी जमीन गेली हाय

पर तो खाकीवाला खाक्यात म्हणतो

पान्याकडं जराबी बघायचं न्हाय

घ्वाटभर पान्या…

गावातला शिद्या मुंबयला राहतो

गेल्याच महिन्यात त्याच्याकडं गेलतो

गटारावरल्या त्याच्या झोपड्यात गटारातल्या

 पान्याशिवाय घडू घेऊन जायला बी पानी न्हाय

आता घ्वाटभर पान्या…

परत येताना यष्टी स्टँडवर, पान्याचा नल खोलला व्हता

पर कचऱ्याच्या ढिगात बसलेल्या तुटक्या नलाला

पान्याचा एक बी थेंब नव्हता

परीश्न पडला भर पावसात

यष्टी स्टँडवर दुस्काल कसा काय ?

आता घ्वाटभर पान्या…

इतक्यात शिद्या परत आला, म्हणतो…. 

गेलो व्हतो पान्याची बाटली इकत आनायला

म्या सहजच इचारलं शिद्याला

काय रं शिद्या आपून पान्याची बाटली इकत घ्यावी

म्हणून कुनी तो नल तोडला का काय ?

आता घ्वाटभर पान्या…

आव पानी आनन्यात दिवस गेला

पान्यासाठी जलम गेला

 पान्याबिगर काय काय व्हतं

चांगलं ठाऊक हाय या जिवाला

 म्हणून म्या सांगूनशान ठेवलंय समद्यानला

आवो डोल्यातलं पानी जालं म्हणून

माझ्या मैतावर कुनीबी रडायचं न्हाय

घ्वाटभर पान्या…

– नागेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *