गोष्ट एका कामगाराची!

“पोटापुरता पैसा पाहिजे
 नको पिकाया पोळी 
 देणार्‍याचे हात हजारो 
 दुबळी माझी झोळी
 एक वितीच्या वितेस पुरते 
 तळ हाताची थाळी
 देणार्‍याचे हात हजारो
 दुबळी माझी झोळी..”
 

ही कविता आहे एका कामगाराची!

आपल्या मराठी साहित्यात अनेक थोर कवी होऊन गेलेत आणि त्यापैकीच कामगारांचे कवी ज्यांना म्हणलं जातं ते म्हणजे नारायण सुर्वे! अगदी आजही मजूर-कामगारांची भाषा बुलंद आहे आणि ती त्यांच्या कवितांच्या बाबतीत सतत आपल्याला आठवते, जाणवते सुद्धा! गिरणीच्या भोंग्यांवर टांगलेलं आणि अठराविश्व दारिद्र्य भाळी लिहिलेला गंगाराम सुर्वे नावाच्या एका गिरणी कामगाराने नारायण नावाच्या सापडलेल्या मुलाला बाप म्हणून आपलं नाव दिलं. दोन वेळच्या खाण्याची भ्रांत असताना ही नारायणला सातवीपर्यंत शिक्षण दिलं. पोटाला चिमटे देत ताटातला घास नारायणाला दिला. नारायणानेही सातवीपर्यंतच्या शिक्षणानंतर गिरणीची नोकरी पत्करली. कळायला लागण्याच्या वयात जॉबरच्या हाताखाली गिरणीतल्या लूमवर काम केलं. पुढे गिरणीतली नोकरी सुटल्यावर कधी हमाली, कधी शिपायाचे काम केले. भाकरीचा गरगरीत चंद्र मिळविण्यासाठी ते कधी घरगडी, हॉटेलात कपबशा धुणारा पोरगा, कुत्रे- मुलं सांभाळणारा घरगडी, दूध टाकणारा अशी कामे करीत वाढले. हाच नारायण पुढे तळपत्या तलवारीच्या धारेचा, सारस्वतांच्या डोळ्यात डोळे घालण्याची हिंमत ठेवणारा कामगार कवी झाला. नारायण सुर्वे नावाचा श्रीमंतांची मुजोरी झुगारणारा नव्या दमाचा समर्थ कामगार कवी मराठी साहित्याला मिळाला.

कामगार आहे मी तळपती तलवार आहे सारस्वतांनो! थोडासा गुन्हा करणार आहे. असं म्हणत कामगारांच्या हक्कासाठी लढा चालू झाला. संकटांच्या खाचखळग्यांची भरलेली आयुष्याची वादळवाट; त्यातून बाहेर पडण्यासाठी, आपल्या हक्कासाठी लढा आपल्या साहित्यातून त्यांनी कामगारांना शिकवला. त्यांच्या अनेक कवितांतून समाजातील कामगार वर्गाची, कष्टप्रद जीवन जगणाऱ्यांची वेदना आक्रमकपणे व्यक्त होत गेली. एका बाजूला गरीब गरीब होत जातोय आणि श्रीमंतांच्या श्रीमंतीचे इमले वरवरच चढताहेत ही अर्थव्यवस्थेची अवस्था नारायण सुर्वेंची कविता ठळकपणे पण अतिशय गहिऱ्या भावनांसह सांगते. 

साध्या भाषेत सांगायचं तर नारायण सुर्वेंची कविता..

आहे रे वर्गाची मग्रुरी झुगारते आणि त्याच वेळी नाही रे वर्गाचं प्रतिनिधीत्व करते.
शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली..

कामगार विषयी अनेक साहित्यातून नारायण सूर्वेनी आपल्याला सांगितलं पण हा कामगार दिवस म्हणजेच एक मे हा दिवस ‘कामगार दिन’ म्हणून केवळ भारतातच नाही, तर जगभरातील ८० देशांत साजरा केला जातो. कामगारांच्या हक्कासाठी उभारलेल्या लढ्यामुळे जगभरात एक नवी क्रांती सुरू झाली पण १८८६ साली उद्योगात १२ तासांहून अधिक काळ राबवणाऱ्या कामगारांसाठी हा हक्काचा लढा देखील सुरू झाला आणि त्यात मिळालेल्या यशाचं प्रतीक म्हणून जगभरात १ मे हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ म्हणून साजरा केला जातो. 

नारायण सुर्व्यांच्या लिखाणात जगण्याविषयीची भाषा होती, जी सामान्य कामगारांना समजत होती. अगदी इतर कवी प्रमाणे त्यांचं लिखाण छंदोमय, क्लासिक नसलं तरी कामगारांच्या मनातल्या वेदना-जाणीव मात्र त्यात होत्या. एकदा ‘कविता बरी आहे; पण कवीला छंदशास्त्राचं ज्ञान नाही,’ असं वसंत दावतरांनी सुर्व्यांबद्दल चारेक दशकांपूर्वी म्हटलं. पण त्यावर ‘कुठल्याही संगीतकाराला माझ्या कवितांना चाली लावता नाही आल्या तरी चालतील पण मी मात्र माझे शब्द मोडून देणार नाही.’ असं म्हणून त्यांनी कामगारांना कधीच एकट सोडलं नाही की त्यांच्या जगण्यातली धडपड शब्दात मांडणं देखील सोडून दिलं नाही. त्यांच्या कवितेतून कामगारांना लढण्यासाठी बळ मिळायचं. ते असेही म्हणत…

कवितेऐवजी रद्दी विकली असती तर बरे झाले असते
निदान देणेकर्‍यांचे तगादे तरी चुकविता आले असते..
असे झाले नाही; आम्ही शब्दांतच इतके नादावलो; बहकलो, 
असे झाले नसते तर कदाचित इमलेही बांधले असते…

त्यांच्या अनेक कवितांवर कम्युनिस्ट विचारसरणीचा पगडा हा जाणवतोच. गोरगरीब कामगार वर्गाच्या अश्रूंनी भिजलेली आणि त्यांच्या कवितेला कष्टकऱ्यांच्या घामाचा वास जरी येत असला तरी कामगार जीवन मिश्कील पद्धतीने त्यांनी मांडलय हे अगदी खरं!

आर.जे.अनु (अनुजा )

विभाग – अहमदनगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *