गिरणी कामगारांचा लढवय्या नेता : कॉम्रेड. दत्ता इस्वलकर !

       मुंबईतील मॉडर्न मिलमध्ये दत्ता इस्वलकर यांचे वडिल जॉबर होते. १९७० साली वयाच्या २३ व्या वर्षी दत्ता इस्वलकर हे मॉडर्न मिलमध्ये नोकरीस लागले. राष्ट्र सेवा दल आणि समाजवादी चळवळीतील अनेक संस्था संघटनांशी निकटचा संबंध असलेले दत्ता इस्वलकर यांनी १९८७नंतर गिरणी कामगारांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्यास प्राधान्य दिले होते. रायगड जिल्ह्यातील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टचे ते उपाध्यक्ष होते. ज्येष्ठ कामगार नेते दत्ता सामंत यांनी १९८२ साली गिरणी कामगारांचा मोठा संप केला. तो लढा अयशस्वी झाला. आणि सुमारे अडीच लाख कामगार व त्यांच्या कुटुंबियांचे भविष्य मातीमोल झाले. 

         गिरणी कामगारांना देशोधडीला लावण्यात सर्व राजकीय पक्षसंघटनांचा कसा सहभाग होता याची जाण इस्वलकर यांना होती. स्वान मिल, मॉडर्न, रघुवंशी, कमला, मुकेश, श्रीनिवास, ब्रडबरी अशा १० मिल बंद झाल्यानंतर गिरणी कामगारांना कोणी वालीच उरला नव्हता. अशा कठीण काळात २ ऑक्टोंबर १९८९ साली दत्ता इस्वलकर व त्यांच्या सहकार्यांनी बंद गिरणी कामगार संघर्ष समितीची स्थापना केली. त्या समितीचे दत्ता इस्वलकर हे निमंत्रक होते.

समितीच्या स्थापनेनंतर एका वर्षांनी ०२ ऑक्टोबर १९९० रोजी गांधी जयंतीला दत्ता इस्वलकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत गिरणी कामगारांच्या रास्त प्रश्नांसाठी बेमुदत उपोषणाला बसले होते. तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या मध्यस्थीने उपोषण सुटले. 

        त्यानंतर १९९१ साली विकास नियंत्रण नियमावली आली. त्याचा फायदा गिरणी मालकांनी गिरण्यांच्या जमिनी विकण्यात झाला. लालबाग परळ भागात त्याकाळी ५८ गिरण्या होत्या. गिरणी बंद पडल्यामुळे गिरणी कामगार देशोधडीला लागले. त्यांच्या कुटुंबाची वाताहत झाली. हे अनुभव पाठिशी असल्यामुळे दत्ता इस्वलकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत नंतर अडीच दशके गिरणी कामगारांच्या हक्कांचा लढा ते नेटाने लढले. 

         मुंबईतील ऐतहासिक गिरणी संपात वाताहात झाल्यानंतर एकेकाळी तत्वांसाठी संघर्ष करणारा गिरणी कामगार ही हतबल झाला होता. आर्थिक परिस्थिती पिचलेल्या त्या गिरणी कामगारांच्या मनात पुन्हा लढण्याची इर्षा निर्माण करण्याचे काम दत्ता इस्वलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. भायखळा परिसरातील न्यू ग्रेट मिलसमोर सुरु केलेल्या उपोषणामुळे गिरणी कामगारांचा लढा पुन्हा दुसऱ्यांदा उभा राहिला. श्रमिक कष्टकऱ्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. गिरण्यांच्या जागेवर केवळ मालकांचाच नव्हे तर राज्य सरकार, मुंबई महापालिका आणि कामगारांचाही हक्क प्रस्थापित झाला. याचा परिणती गिरणी8 कामगारांना गिरण्यांच्या जमिनीवर मोफत नव्हे तर किफायतशीर दरात मालकी हक्काची घरे देण्यात झाली.

          गिरणी कामगारांच्या न्याय हक्कांसाठी आणि त्यांना मालकी हक्काची घरे मिळण्यासाठी दत्ता इस्वलकर आयुष्यभर शेवटपर्यंत संघर्ष करीत राहिले होते. अलीकडे त्यांच्या प्रकृतीच्या तक्रारी वाढल्या होत्या. ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर त्यांच्या तब्येतीत अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. गिरणी कामगारांच्या आंदोलनाची माहिती सांगणाऱ्या प्रेमळ स्वभावा च्या तत्वनिष्ठ प्रामाणिक लढवय्या नेत्याने आज 07 एप्रिल,  2021 (बुधवार) रात्री मुंबईतील जे. जे. हॉस्पीटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.  ७२ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. गिरणी कामगारांच्या लढ्यातील एक प्रामाणिक, जिद्दी आणि अखेरपर्यंत लढणारा समर्पित कार्यकर्ता त्यांच्या निधनामुळे निमाला आहे. अशीच भावना कामगार चळवळीतील विविध नेत्यांची व त्यांच्यासोबत कार्यरत चळवळीतील कार्यकर्त्यांची होत आहे.

          संघर्षशील, तत्वनिष्ठा, प्रामाणिक आणि वैचारिक स्पष्टता असलेल्या दत्ता इस्वलकर यांच्यासारख्या प्रामाणिक नेत्यास विनम्र अभिवादन !

सौजन्य – सुनील तांबे ( मटा प्रतिनिधी )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *