“खासगीपण….”

“खासगीपण…” या शब्दातच किती हळूवारता आणि संवेदना जाणवते न..! सध्याचं जग हे आधुनिकतेचं जग आहे असं मानलं जातं किंबहुना ते तसंच आहे. आपण सगळेच “सोशल” झालेले आहोत. हो! अगदी सगळेच! सामान्यातल्या सामान्य घरात दहावी-बारावी शिकणा-या मुलांपासून ते आजी-आजोबांपर्यंत सगळेच सोशल मिडीयावर “सोशली सक्रीय” झालेलो आहोत. खरं तर ते असणं ही काळाची गरज ठरली आहे असं म्हणायला हरकत नाही. 

सणवार, रीतीभाती, परंपरा, वाढदिवस, आनंद-दु:ख, उत्साह, प्रेम, सहवास, ब्रेकअप-पॅचअप, लग्न-सोहळे ते अगदी निधनवार्ता..! अहो शेजारच्या घरात तो व्यक्ती शेजारी असून पाच पावलं न चालता आपण सर्रास मेसेज फॉरवर्ड करून सण साजरे करतो. प्रथेला, रीतीला, आपुलकीच्या भेटीगाठीनां देखील आपण सोशली सक्रीय होऊन हरवलं की..! यात वाईट काही नाहीये हो! किंवा चुकीचं देखील मुळीच नाही. पण याही पलीकडे जाऊन आपण आपल्याच हाताने खासगीपणाला सोशल मात्र केलं. पूर्वी चार-चौघात सांगितली जाणारी गोष्ट आता खुलेपणाने मांडली जाते. या खुलेपणाच्या स्वातंत्र्याचा एक फायदा आपल्याला नक्कीच झाला, ज्या गोष्टींवर चर्चा केली जात नव्हती, ज्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने प्रथेच्या नावाखाली पाळल्या जात होत्या त्या रूढींना, चुकीच्या समजूतींना आळा बसला. चार पावलं पुढे जाऊन प्रगती करणारे आपण चाराची कितीतरी पावले पुढे गेलो आणि स्वतःभोवती असुरक्षिततेचं जाळं ओढून घेऊ लागलो. 

“खासगीपण” हा आपला मुलभूत अधिकार आहे. पण या अधिकाराचा वापर करताना आपण “गोपनीयता आणि खासगीपण” याचा फरक मात्र विसरत चाललो आहोत. राईट टू प्रायव्हसी हा खासगीपणाचा अधिकार आहे, गोपनीयतेचा नाही आणि हेच समजून न घेता आपण जगत आहोत. जेव्हा आपल्याच मुलभूत अधिकारांचे आपल्याकडून उल्लंघन होते तेव्हाच आपल्याला चपराक बसते. आणि हीच आपल्या समाजाची समज आहे किंवा याचा मनुष्यस्वभावाशी संदर्भ आहे  असं म्हणायला हरकत नाही.            

खासगीपणाचं भांडवल सोशली व्हायला लागलं आणि गुन्हेगारीचा सुळसुळाट सुरु झाला. गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्याऐवजी गुन्हेगारी प्रवृत्तीला सुगीचे दिवस आले असं म्हणावं लागेल. पूर्वी तंत्रज्ञान विकसित झालेले नसताना गुन्हेगारी ही एका ठराविक साच्यामध्ये बांधली गेली असायची. उदाहरण द्यायचे झाले तर लहान-मोठ्या चोऱ्या, घरफोडी, जीवघेणा हल्ला, लूटमार अशा साचेबंद स्वरूपात गुन्हेगारी दडलेली असायची आता या गुन्ह्याच्या पद्धतीमध्ये देखील विकसन झाले आहे. शारीरिक लूटमार न करता सायबर हल्ला, ब्लॅकमेलिंग, प्रेम प्रकरणातून फसवणूक, तांत्रिक गुन्हे, सेक्स टुरिझम, ड्रग्स प्रकरण, पोर्नोग्राफी, घरगुती हिंसाचार, समाजमान्य बलात्कार,मानसिक असंतुलन, विकृतीचे वाढते प्रमाण अशा स्वरूपातील गुन्हेगारी सध्या दिसून येत आहे.

सोशल होणं, तंत्रज्ञानाचा वापर आपल्या फायद्यासाठी करणं यात गैर काहीच नाहीये. पण याच गोष्टीचा दुरुपयोग सर्वसामान्यांचे जीवन, राष्ट्राची सुव्यवस्था, अर्थव्यवस्था डळमळीत करू शकतो याचंही भान राखणं आपलं कर्तव्य आहे. जितक्या सहजतेने आपण सोशल मीडियावर आक्षेपार्ह, जातीय तेढ, अफवा अथवा एखाद्या व्यक्ती, समाजाबद्दल निंदा अशा आशयाचे संदेश टाकतो, फॉरवर्ड करतो तितक्याच सहजतेने चांगल्या गोष्टींच्या बाबतीत तत्परता आपण का दाखवत नाही..? साधारणत: सर्वसामान्य नागरिकांचा आपल्या समाजात असा समज आहे की, सायबर क्राईमशी आमचा काही संबंध नाही. आम्ही त्या फंदात पडतच नाही. पण याच समजामुळे नागरिक सायबर क्राईमबाबत अनभिज्ञ आहेत. पण जरा विचार करून पाहिलं तर आपल्याला रोजच या सायबर क्राईमचा सामना करावा लागतो आहे. आपल्या ई-मेलवर स्पॅममेल येत असतात, मोबाईलवर अनावश्यक कॉल, मेसेजेस येतात, नेट बँकिंग अकाऊंट असेल तर त्याचा पासवर्ड, आय. डी. हॅक होतो. हे सर्व प्रकार सायबर गुन्हेगारीमध्ये मोडतात. सायबर क्राईमबाबत अनभिज्ञ असणं हे एखादा गुन्हा करण्याइतकंच अपराधीपणाचं लक्षण आहे. 

                मानवाला मिळालेल्या स्वातंत्र्याच्या अधिकाराने मानव आत्मकेंद्री होताना सध्या दिसत आहे. मी, माझा, माझे, आमचे, आपले असं म्हणत माणूस ‘खासगीपणा’चा हक्क गाजवता गाजवता खासगीपणाबद्दलच्या सीमा ओलांडून पुढे चालू लागला. त्यात भरीस भर म्हणून तंत्रज्ञानाच्या डिजिटल भरारीने माणसामाणसांतील खासगीपणाच्या भिंती कोसळू लागल्या. खासगीपणावर झालेल्या या डिजिटल आक्रमणाची चर्चा सध्या जगभर सुरू आहे. समाजमाध्यमांपासून न्यायालयापर्यंत आणि राजकारणापासून कुटुंबापर्यंत प्रत्येक ठिकाणी खासगीपणा अर्थात ‘प्रायव्हसी’चा मुद्दा गाजत आहे. गोपनीयतेच्या, खासगीपणाच्या जुन्या समजुती आता कालबाह्य़ ठरू लागल्या आहेत. अशा वेळी आपला “खासगीपणा” जपण्यासाठी त्याकडे नव्या दृष्टिकोनातून पाहणं गरजेचं आहे.

– अनुजा मुळे

अहमदनगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *