खरे कोरोना योद्धे सफाई कामगार..!!

आज आपण सर्वजण कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून काळजी घेत असतो. पण सफाई कामगारांचे काय? ते बिचारे उन्हातानात कुठे कुठे कचरा वेचण्यासाठी,साफ करण्यासाठी भटकत असतात. तेही आपल्या जीवाची काळजी न घेता स्वतः तो घाणीतला कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावत असतात. कोरोना च्या काळात डॉक्टर, नर्स हे देव आहेतच. पण सफाई कामगार सुद्धा यामध्ये मोडतात, असे म्हणायला हरकत नाही. एक दिवस जरी मोठ-मोठ्या सोसायट्यांमध्ये कचरेवाला आला नाही तर घरामध्ये असणाऱ्या कचऱ्याची स्त्रियांना घाण वाटू लागते. त्या कचऱ्याचा वास आपण दहा सेकंद पण घेऊ शकत नाही. म्हणून तो कचरा आपण ताबडतोब  कचऱ्याच्या डब्ब्यात किंवा कचरा असणाऱ्या ढिगाऱ्यात  जाऊन टाकतो. पण कधी आपण विचार केला तर नक्की समजेल की, सफाई कामगार त्याच कचर्‍याच्या ढिगार्‍यात दोन-दोन, तीन-तीन तास त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी, ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी तासनतास काम करत असतात.

सफाई कर्मचाऱ्यांमध्ये काही कामगार तर असे आहेत की, जे दोन वेळचे खायला भेटावे म्हणून शौचालयाच्या टाकीत देखील उतरून साफसफाई करत असतात. कारण त्यांना त्यांचे घर चालवायचे असते. तेव्हा ते त्यांच्या जीवाची पर्वा न करता काम करतात. कितीतरी कामगारांचे या घाणीतल्या टाकीत उतरल्यामुळे आजारी पडून मृत्यू झाल्याचे प्रमाण ही जास्त आहे. पण याचा विचार किंवा यावर होणारी चर्चा फार कमी प्रमाणात दिसून येते. कारण त्यावर फारसे लिहिले जात नाही आणि बोलले ही जात नाही.

मात्र आता कोरोना च्या काळात अनेक सोसायट्यांमध्ये कचऱ्यावाल्याचे महत्व काय आहे ते दिसून आले. कारण लॉकडाऊन असल्या कारणाने सर्व सोयी सुविधा बंद झाल्याने सफाई कर्मचारी म्हणजे बिल्डींग मधील कचरे वाले हेदेखील सुट्टीवर होते. त्या दिवसात कचरा साचून घरातील लोकांना त्या-त्या ठिकाणी कचर्‍याच्या ढिगार्‍यात तो कचरा स्वतः जाऊन टाकावा लागत होता. त्यावेळी कित्येकांच्या घरात कचरा फेकायला कोण जाणार यावर वाद व्हायचा. मी स्वतः माझ्या घरातले उदाहरण देते. आई मला रात्रीच्या वेळी कचरा फेकायला सांगायची. मी मात्र “बहिणीला सांग किंवा तू स्वतः जा” असे बोलायचे आणि माझी बहिण, तिला तर  कचऱ्याची थैली घ्यायला सुद्धा लाज वाटत होती त्यामुळे कचरा साफ करणे हे तर दूरच राहिले. असं माझ्या बहिणीच्या बाबतीतच नाही तर  कितीतरी तरुण मुला-मुली आहेत की ज्यांना कचरा टाकायला लाज वाटत असेल. पण जेव्हा ते सफाई करणारे लोक आपली घाण उचलतात, तेव्हा त्याची मला आता खंत वाटते. खरंच सफाई कामगार लोकांचे काम खूपच कठीण असे आहे. कोरोनाशी युद्ध करणारे सफाई कामगार हे सुद्धा एक योद्धे आहेत.

सफाई कामगारांचे या काळात येणारं महत्व पुढच्या काळात जेव्हा कुठलाही साथीचा आजार नसेल त्यावेळी असंच राहणे गरजेचे आहे. शिवाय शासन या सर्व सफाई कामगारांच्या आरोग्याची तसेच त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने लागणाऱ्या सर्व साधनांची काळजी घेईल, असा विश्वास खरं तर व्यक्त करायला हरकत नाही. कारण आपण प्रत्यकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे, “जान है तो जहान है”, त्यामुळे येत्या काळात आपल्या परिसरात स्वच्छता ठेवायची असेल तर आपल्याला या स्वच्छता दूताची काळजी घेतली पाहिजे. प्रशासन त्यांच्या पद्धतीने काम करेल, मात्र या सफाई कामगारांना ‘कचरावाला’ हाक न मारता किमान आदर देऊन त्यांच्याशी दोन शब्द प्रेमाने बोलले तरी त्यांना बरं वाटेल.

 एवढी जबादारी एक नागरिक म्हणून आपण नक्कीच पार पडू शकतो.

~ पूनम निरभवणे 

विभाग – मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *