
पूर्वीच्या काळी भारतातील कामगारांची स्थिती अत्यंत निराशाजनक होती. मालक,भांडवलदार वर्ग, दुर्बल असंघटित कामगारांना वाटेल तसे राबवीत होते. कामगार संघटना सुद्धा मालकधार्जिन्या असल्यामुळे कामगारांचे अस्तित्व गोठवून टाकले होते. शोषित, कष्टकरी कामगार वर्ग गुलामीचे जीवन जगत होते. कामगारांना फक्त जनावरासारखे राबवून त्यांचे शोषण केले जात होते. कामगारांना कामाचा वेग वाढवावा लागत असे, थोडं जरी थांबलं तर वेळ निघून जाईल आणि आपण मागे राहू, ही भीती त्यांना असायची. त्यांच्या तोंडावर माशी बसली तरी तिला हाकलन्या इतपत त्यांच्यात ताकत नसायची आणि घरी आल्यावर स्वयंपाक करून खाणे तर दूरच राहिलं; ती अशीच उपाशीपोटी झोपत असत. दिवसभर काम करून ते थकून जात असत. काही कामगार तर सकाळी लवकर उठून कामावर यावे लागते म्हणून घरी न जाता कामाच्या ठिकाणीच झोपत असत.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या काळात मजूर मंत्री (१९४२-१९४६) होते. त्यांनी सेवायोजन कार्यालयाची स्थापना केली. त्याकाळी जे अनुभवी नि अर्धाशिक्षित तज्ञ निरनिराळ्या योजनेतून तयार होत होते. त्यांना नोकरीसाठी भटकावे लागू नये, त्यांना नोकरी मिळण्याचे मार्ग मोकळे असले पाहिजे हा सेवायोजन कार्यालय स्थापन करण्याचा मुख्य उद्देश होता. १३ मार्च १९५४ रोजी कोळसा उत्पादन आणि स्त्री खाण कामगार या दोन्ही बाबींचा विचार मांडून कामगारांचा महागाई भत्ता, नुकसान भरपाई, असमान महागाई भत्त्याला मजूर संघटना जबाबदार बेकारीच्या काळातील नुकसानभरपाईची पद्धत, कामगाराचा राजीनामा, खाण कामगारांचे वेतन व सवलती, मजूर खात्याचा नोकर वर्ग, कोळशाच्या उत्पादनाचा प्रश्न, स्त्री खाण कामगार आणि महिला परिषद यावर डॉक्टर आंबेडकर यांनी भाष्य केले. ज्याप्रमाणे पुरुष खाण कामगारांबद्दल डॉक्टर आंबेडकर यांनी विचार व्यक्त केले, त्याचप्रमाणे स्त्रियांबाबतही २९ मार्च १९४५ ला विधेयक आणून चर्चा केली. स्त्री कामगारांचे हित जोपासले. तसेच प्रसूतीच्या काळात विश्रांतीची तरतूद, रोख मदत इत्यादी तरतुदी केल्या. किमान चार आठवडे प्रसूती भत्ता मिळावा तसेच कामगार गैरहजर असताना त्यांना पगारी सुट्ट्या मिळाव्यात त्याच बरोबर कायद्याखाली नियम करण्याचा अधिकार आणि खाण कामगारांना शॉवर बाथची योजना सुद्धा अंमलात आणली होती. युद्ध काळात मजूरांना योग्य न्याय मिळावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्यातील नोकरीच्या अटी शक्तीचा लवाद, मजुरांचे प्रश्न व मजूर खाते, स्त्री पक्ष मजूर परिषदेचे महत्व, मजुरांचे बहुरंगी पुढारी पगारी सुट्टी यांचे वर्गीकरण केले. डॉक्टर आंबेडकर खाण मजुरांसाठी किती पोटतिडकीने बोलत याचा प्रत्यय त्यांच्या भाषणातून, कायद्यातून येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर दलित-शोषित, पीडित कामगारांचे भवितव्य अंधकारमय झाले असते.
आज कामगारांची स्थिती वाईट आहे. नव्या कामगार धोरणाचा फारसा लाभ नाही. राज्यवाद फोफावत आहे. जागतिकीकरण आले, यांत्रिकीकरण सुरू झाले. त्यामुळे सामान्य माणूस भरडला जात आहे. साम्राज्यवाद, नववसाहतवाद, सांस्कृतिक दहशतवाद, बहुराष्ट्रीय कंपन्या इत्यादींमुळे माणसाच्या घामाचा दाम कमी आणि भांडवलदाराला जास्त नफा या दोन्ही फरकामुळे गरीब हा दिवसेंदिवस गरीब तर श्रीमंत हा अधिकाधिक श्रीमंत होत आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांची घसरण होत आहे. माणसाचे अवमूल्यन होत आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. अशा शासक समाजव्यवस्थेविरुद्ध आपण प्रतिरोध केला तरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत आपण घडवू शकू. तेव्हा प्रत्येकाचे जीवन सुंदर होईल. प्रगती करता येईल आणि चळवळ ही पुढे नेता येईल.
~ दिक्षा गौतम इंगोले
विभाग – मुंबई