“उधानलेलं प्रेम”

प्रेम या शब्दाचा उलगडा लहानपणापासूनचं होत गेला, घरच्यांपासून ते इतर नवनवीन माणसांकडून प्रेम हे भरभरून मिळत गेलं, अनेकांना प्रेम हे फक्त माणसांमध्ये दिसतं मला ते इतर अनेक घटकांमध्ये अधिक जाणवतं त्यामध्ये ही मला लहानपणापासून समुद्र खूप जवळचा वाटतो. कारण मुंबई मध्ये वाढल्यामुळे जास्त संबंध हा समुद्राशी आला.  शाळा ही समुद्राच्या जवळ, कॉलेज ही समुद्राजवळ आणि त्यानंतर पुढे काम ही समुद्राजवळ त्यामुळे आयुष्यच समुद्र झालंय जिथे उधाण येतं प्रेमाला, भरती येते सुखाला आणि लाटे सरशी विरघळून जातातं दुःख!  त्यामुळेच त्याच्याशी हळू हळू इतकं जवळचं आणि विश्वासाचं नातं तयार झालं की तो जिवलग झाला.  आयुष्यात काहीही नवीन गोष्ट घडली की ती पहिली त्याला सांगावीशी वाटते, आणि त्याला ही ती भावली की मग तो आनंदाची उधळण करत लाटांमार्फत उसळत राहतो. मग असं वाटतं की जणू काही मला मिठीत घेण्यासाठी तो आतुरलाचं आहे. हा समुद्र जितका माझ्या सुखाचा साथीदार आहे तितकाच दुःखाचा ही, मी कधी दुखावले, अस्वस्थ झाले की त्याच्याच जवळ तासंतास त्याला बघत राहावंसं वाटतं, आणि म्हणूनच म्हणावसं वाटतं  ” माझं नशीब , लाटांसारखं… कधी अवखळ ….कधी संथ, किनाऱ्यावर उध्वस्त होणं, हाच ठरलेला अंत !

                     असं जरी होत असलं तरी हाच समुद्र भाग पाडतो लिहायला. घरात बसून चहा घेताना कधी सकाळी मन जात समुद्र किनारी, त्याचं ते सकाळच्या वेळी असलेल रम्य वातावरण मनाला खूप प्रसन्न करतं. अन संध्याकाळी तर तो इतका आकर्षक वाटतो की त्याच्याकडे  पाहिलं की दुःख, निराशा, विसरायला होते.  त्याचं ते शांत असणं आणि सर्वांना क्षणात एका वेगळ्या वळणावर घेऊन जाणं मला खूप भावतं आणि म्हणूनच तो मला दिवसेंदिवस आणखी आवडत राहतो, आणि मी नव्याने त्याच्या प्रेमात पडत राहते.  मला त्याला जवळ घ्यावस वाटलं की मी मुक्त पणे त्यात भिजते आणि त्या पाण्याच्या प्रत्येक थेंबातल्या त्याला इतकं घट्ट कवटाळते की मग तो मला रोमांचित करतो आणि तो माझ्या अधिक जवळ येत राहतो. त्याच्या प्रेमाने मी इतकी विरघळते की त्याच्या सारखाच जिवलग मला जोडीदार म्हणून मिळावा याची स्वप्न पाहते. मला सतत वाटत राहतं की माझ्या जोडीदाराचं आणि माझं प्रेम हे समुद्रासारखं निरपेक्ष असावं.  ज्यामध्ये आम्ही एकमेकांची स्वातंत्र्य जपू, एकमेकांना समजून घेऊ, मला हवं तेव्हा मी त्याच्यासमोर अशीच मुक्तपणे व्यक्त होतं राहीन, जशी समुद्राजवळ व्यक्त होत राहते.  माझं जेवढं प्रेम हे समुद्रावर आहे तेवढंच प्रेम हे चळवळीवर आहे.  त्यामुळे समतेच्या लढ्यात नेहमी माझा जोडीदार माझ्या सोबत खंबीरपणे उभा रहावा आणि मी त्याच्या प्रेमाच्या महासागरात अखंड बुडावं, त्याच्या सोबत समतेच्या नावेला किनारी लावावं, मग येईल उधाण बंधुत्वाला अन स्वातंत्र्याच्या लाटा धडकतील किनाऱ्याला मग येईल त्सुनामी मानवमुक्तीच्या विचारांची आणि वाट मोकळी होईल माणुसपणाची….

ऍड. अनुराधा शोभा भगवान नारकर

मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *