
खरचं इज्जत, अब्रू ही योनीशी जोडली आहे का ?
नाही आणि कधीच नसेल, इज्जत हा शब्द लोकांनीच आपल्या शरीराला दिलेला आहे. विशेष करूण महिलांना देणगी म्हणून जन्मल्यापासून मिळाला आहे. असंच म्हणावं लागेल ! वयात आल्यानंतर खरा संघर्ष सुरू होतो. इज्जत हा शब्द तेव्हा आपल्या मनाशी, शरीराशी, एखाद्या फेविकॉल सारखा चिटकवला जातो. खेळण्यापासून ते अगदी झोपण्यापर्यंत सगळयावर बंधन लादली जातात. तुला कळत का? मोठी झालीस तरी मुलांमध्ये उड्या मारतेयस, अग लोक काय म्हणतील? तू मुलगी आहेस तुला घराच्या बाहेर गेलंच नाही पाहिजे, पोरीची जात तू, तू अस काही वागू नकोस ज्यामुळे तुझ्या बापाच नाव खराब होईल, मला आज पर्यंत नाही कळलं पोरगी चुकीचं वागल्याने पोरीचं नाव खराब होत की बापाचं? तिने लग्न करून जाईपर्यंत आपली इज्जत सांभाळावी, त्यासाठी ती इज्जत घरातच लपवून ठेवायची . मग तिची इज्जत घरात नाही का जात?
जेव्हा एखादा बाप, एखादा भाऊ, काका, मामा, अमका – तमका तिचं तारुण्याने खुललेलं शरीर बघून विकृत होतो, तिला एखाद्या भुकेल्या कुत्र्या सारख बघून तिची लक्तर तोडतो, तेव्हा तिची इज्जत कुठे निघुन जाते ? जेव्हा तिचा जन्म होतो आणि तिच्यावर संघर्षाचे खापर पडते आणि तिच्या खडतर जीवनाला सुरुवात होते तेव्हाच ती आतून अर्धी मेलेली असते. एखाद्या स्त्रीची इज्जत जर तिच्या योनीत असती तर आज त्या सगळ्याच बाया बेअब्रू झाल्या असत्या ज्या इच्छा नसताना पोटासाठी आपल्या देहाची किंमत मोजत आहेत. म्हणजे तुम्ही सहखुषीने जेव्हा मर्जी असेल तेव्हा दुसऱ्या बाई सोबत झोपलात की ते शरीरसुख. मग ते अमानुषपणे होत असेल तरीही तिने उफ्फ.. पण नाही करायचं आणि तेच भर रस्त्यात तिच्या देहाच्या चिंधड्या करून तिच्या मनाचा देहाचा बलात्कार झाला तर ती बेईज्जत झाली आणि तिच्यासोबत घराची ही इज्जत निघते.
वाह! रे वाह ! कधी बदलणार ही मानसिकता ? ज्या दिवशी इज्जत हा शब्द लोकांच्या विचारातून आणि कृतीतून निघेल तेव्हा देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र होईल. आणि तेव्हा अभिमानाने आम्ही म्हणू शकतो “आम्ही आहोत बंधमुक्त स्वतंत्र स्त्रीया”.
~ Adv.Anuradha Bhagwan Narkar