आरोपी प्रेमाला वाचवा ..

साल-सालो गावकुसाबाहेर चुलीतल्या फुफुटयासारखं जगणं असो की, मलबारहिल मधल्या उंच इमारतीतील ऐशो-आरामचं जिणं प्रेमाचं मोल मात्र एकच असावं परंतु कष्ट हे वेगवेगळे असतात. लहानपणापासून मरेपर्यंत आई वडिलांचं आपल्या बाळांवर, प्रियसी-प्रियकराचं आपल्या जोडीदारावर, मित्राचं आपल्या मैत्रीवर, शेतकऱ्याचं आपल्या शेतीवर, कार्यकर्त्यांचं आपल्या आंदोलनावर आणी सर्वांचं कुठेना कुठे कुणावर तरी प्रेम असत!  मला असं वाटत की हे असायलाच हवं.

काही लोकांना अस वाटतं की जिवन हे अटी- नियमांवर चालतं मला असं वाटतं की हे मूल्यांवर चालतं! बऱ्याच मूल्यांचं मिश्रण होऊन प्रेम तयार होत! विश्वास, भावना, आपुलकी, सहवास आणि काळजी ज्या व्यक्ती बद्दल वाटते त्याच्या वर आपलं प्रेम असतं अस मला वाटतं ! पण प्रेम एवढ साधं सोपं असलं तरी त्याला भले भले घाबरत.

जगातल्या सर्वच धर्मग्रंथ, पोथी पुराणे, एकमेकांशी आपुलकी जपा, माणूस म्हणून जगा, अस म्हणतात मग दुसरीकडे तोच धर्म गावाच्या म्हाराच्या पोरानं सुभेदाराच्या पोरीशी प्रेम केलं ! कळतंच त्यांची कत्तल करतात. अस का? इथली माणुसकीचं काय? प्रेम दोषी नाही, प्रेम करणं दोष नाही. दोष त्या विचारधारेचा जो जात, पंथ, धर्म, वर्ग, लिंग बघून प्रेमाची सीमा तयार करतात. जाती-वर्ग धर्माच्या ठेकेदारांनी प्रेमाला चिखल तुडवावं तस तुडवलंय ! आणि जगाच्या कोर्टात आरोपी म्हणून कटघर्यात उभं केलयं. आपल्या सगळ्यांना मूल्यांच्या आधारावर त्याला निर्दोष मुक्तता व्हावी यासाठी संघर्ष करायचा आहे. आणि लव्ह जिहाद च्या नावाखाली प्रेमाचे राजकारण करणाऱ्या मनू  विचाराच्या  हिटलर शाहीला खरी प्रेमाची व्याख्या समजवायची आहे.

प्रेम हे भावनेचे प्रतीक आहे, भावना नैसर्गिक आहे आणि माझ्या जीवनात निसर्गाला पाहिले स्थान आहे. निसर्गाच्या विरुद्ध असणारी समाजव्यवस्था प्रेमाला हीन वागणूक देत असतानाही आपण गार उभे आहोत. याच समाजव्यवस्थेने प्रेम इतकी लाजिरवाणी गोष्ट बनवुन ठेवलीय की मनमोकळे पणाने प्रेम व्यक्त करण  म्हणजे वाईट! प्रेम व्यक्त करतांना  एक भीती मनात निर्माण  करून ठेवलीय…! पण का?

सत्ताधारी सत्ता वाचवण्यासाठी प्रेमाचा वापर करताय आणि मुद्दे रंगवून नात्यामध्ये तेढ  निर्माण करताय.  प्रेमाला गुन्हेगार ठरवून खेळ खेळताय. आपले पणाचे भाव कायम ठेवून या प्रवाह विरुद्ध जाऊ.  प्रेम जगात जो पर्यंत आहे, तो पर्यंत मानवी आस्तित्व आणि मानवता असेल. नाही तर  प्रेम विसरून द्वेष करत मानव मानवाचा वैरी होणार  आणि स्वतःच अंत करून बसणार.

– प्रजा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *