
आज नदीकाठी सये
तुह्ये मिळाले पतुर
तुह्या भेटीसाठी महा
जीव झालाय आतुर.
तूही येनी अशी हालं
जशी नागिनीची चाल
अन् बांधता बुचडा
होती जीवाचे गं हाल
तुह्या ओठी बोल असे
जशी वाजती सतार
तुह्या भेटीसाठी महा
जीव झालाय आतुर.
तूही चाल लय भारी
तूह्ये बोल लय भारी
तुह्या अंगाशी लागता
उन्हं जळते दुपारी
काय बोलू तुह्या पुढं
शब्द झालेत फितूर
तुह्या भेटीसाठी महा
जीव झालाय आतुर.
उन्हं तुला गं लागता
जीव महा तळमळे
येनी ओठाशी धरी तू
लय जीव महा जळे
कशी छळतेस मला
लय तू सये चतुर
तुह्या भेटीसाठी महा
जीव झालाय आतुर.
तूही घागर कोरडी
आड आटलेला सारा
तुह्या मनगटाला पुर
किती डोळ्याला या धारा
कशी तोडावी उन्हाची
पायी बांधलेली बेडी
कशी भरावी साजणी
तुही घागर कोरडी.
जशी कोरड्या मातीला
पावसाची हुरहूर
तुह्या भेटीसाठी महा
जीव झालाय आतुर.
– नागराज पद्मा कौतिकराव (कविरंग)
विभाग – मुंबई