आजचं प्रबोधन

महाराष्ट्रात तुकाराम जन्माला आले, लोकहितवादी जन्माला आले, जोतिबा-सावित्रीबाई आणि ह्यांसारखे अनेक सुधारक ह्या महाराष्ट्रात होऊन गेले. ह्या सर्व व्यक्तींच्या योगदानामुळेच महाराष्ट्रात प्रबोधनाची उज्ज्वल परंपरा सुरू झाली. ती पुढे आगरकर, महर्षी कर्वे ते अगदी प्रबोधनकार ठाकरे यांच्यापर्यंत अखंड सुरू राहिली. ह्यानंतर नरेंद्र दाभोलकरांसारख्या विज्ञाननिष्ठ विचारांच्या व्यक्तींमुळे ती परंपरा महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने नांदली. असं असूनही ह्याच महाराष्ट्रात तुकारामांच्या मृत्यूविषयी वेगवेगळ्या अंगांनी चिकित्सा केली जाते. आणि ह्याच महाराष्ट्रात डॉ. दाभोलकरांचा खून होतो. हे वास्तव अजिबातच दुर्लक्षित करता येण्यासारखं नाही. आज ह्या सगळ्या सुधारकांची आपल्यापैकी खरंच किती जणांनी आठवण ठेवली आहे ? किंबहुना ह्यांचं ह्या प्रबोधनपरंपरेचं केवळ स्मरण करणं पुरेसं आहे का ? ह्या प्रश्नाचं उत्तर अर्थातच ‘नाही’ असं आहे.

आतापर्यंत होऊन गेलेल्या सुधारकांच्या काळातली आव्हानं आणि आज आपल्यापुढे उभी ठाकलेली आव्हानं ह्यांचा विचार केल्यावर लक्षात येतं की समाजात पूर्णपणे सुधारणा करण्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले. त्यांच्यामुळेच अनेक सुधारणा घडल्यादेखील. परंतु आता आपण अशा टप्प्यावर आले आहोत जिथे काही भागात सुधारणा घडल्या आणि काही भागात सुधारणा घडवून आणण्याची गरज आहे. आपल्याला ही विषमता त्रास देत आहे. 

ज्या प्रबोधकांच्या समाजसुधारकांच्या भूमीत आपण जन्माला आलो त्या भूमीतलं आजचं वास्तव आपण डोळसपणे पाहण्याची गरज आहे. त्याकाळी प्रबोधकांना ज्या गोष्टी खटकत होत्या विज्ञानविरोधी वाटत होत्या त्या त्या गोष्टींवर त्यांनी त्यांची धारदार लेखणी फिरवली. प्रसंगी आंदोलने छेडली, संप पुकारले. सनातन्यांचा प्रखर विरोध पचवला. त्यांनी सुरुवात केली कदाचित म्हणूनच आपण पुढचं विज्ञाननिष्ठ आणि सुसह्य आयुष्य जगू शकतोय. पण त्यांनी उभारलेल्या लढयाने आज पूर्णत: सुधारणावादी विचार समाजात रुजले आहेत का ? याचा विचार व्हायला हवा. आजही आपल्या महाराष्ट्रात काही ठिकाणी बालविवाह केले जाताहेत जातीपातींमध्ये वाद निर्माण होताहेत. तथाकथित बुवा – बाबा माणसांना बळी देऊन मारताहेत. या आणि अशा अनेक घटना आपण वर्तमानपत्रांत, समाजमाध्यमात वाचत असतो, पाहत असतो. पण केवळ वाचतो ह्याविरोधात काही करण्याची खरंच आपली इच्छा होते का ? नसेल तर ती व्हायला हवी. आजच्या घडीला अनेक संस्था, संघटना अशा विज्ञाननिष्ठ विचारांचा पुरस्कार करत आपापली कामे करत असतात. किमान या प्रबोधकांच्या भूमीत जन्मलेले युवक म्हणून तरी आपण या मार्गाने जाऊन काही कामं करायला हवीत आणि बदल घडवायला हवेत.

आज आपण ऐकलेल्या सगळ्या व्यक्तींनी आपापला विवेक जागृत ठेवला म्हणूनच वेळावेळी अंधश्रद्‌धा आणि ढोंगी विचारांना ते आळा घालू शकले. त्यांची ते राहत असलेल्या समाजाप्रती काहीएक निष्ठा होती म्हणूनच त्यांनी त्या समाजाला प्रगतीच्या वाटेवर आणण्यास सहाय्य केले.ह्या सगळ्यामुळे त्यांना होणारा त्रास त्यांनी सहन केला. धर्मांध समाजाच्या विरोधाला जुमानले नाही. ह्यांचा एखाद्या विज्ञाननिष्ठ विचाराप्रती असलेला विश्वास, त्यासाठी त्यांनी केलेला त्याग, समर्पणभाव, ध्येयवेडेपणा ह्या सगळ्या गोष्टी ह्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत. आपण स्वतःची प्रगती तर करायला हवीच पण आपल्या समाजातल्या इतर घटकांसाठी जर आपण काम करणार नसू तर त्या प्रगतीचा काहीच उपयोग नाही.

एक सुशिक्षित आणि सुसंस्कृत माणूस म्हणून आपली जबाबदारी काय, हे आपण ओळखायला हवं. आपण आपल्याला घटनेने दिलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य खरंच वापरणार आहोत की केवळ त्याच्या गप्पा मारून ते वापरतोय असं भासवणार आहोत. मूळात अभिव्यक्ती कशासाठी ? आपल्या अभिव्यक्तीने समाजात तेढ निर्माण व्हावी का समाजोपयोगी गोष्टींसाठी ती कामी यावी ? आज आपली मतं मांडताना, आपले विचार मांडताना आपण का घाबरतो आहोत ? ह्या सगळ्या प्रश्नांचा विचार करताना आपण प्रत्येकाने आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. खरंच कोणत्या व्यवस्थेच्या दबावाखाली आपण जगतोय का ? जगत असू तर हा दबाव हे बंधन झुगारून द्यायला हवं. खरेपणातली, विज्ञानातली ताकद नक्कीच हे करू शकते. गरज आहे ती डोळसपणे आपल्या आजुबाजूची परिस्थिती न्याहळण्याची आणि त्यायोगे कृती करण्याची. थोडक्यात, आजवरच्या प्रबोधकांनी केलेल्या कार्याची जाण ठेवत त्यांच्या पाऊलखुणा तर जपूयाच आणि आपल्या जबाबदारीचं भान बाळगून त्यांनी आखून दिलेल्या मार्गाने वाटचाल करू या.

– वनश्री अनंत अपर्णा राडये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *