अण्णाभाऊ आज असते तर…!

माझी मैना गावाकडे राहिली…! ही लावणी ऐकली की नाव आठवत ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच. क्रांतीची ठिणगी पेटवून अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या  या थोर अण्णाभाऊ साठे यांची आज 101 वी जयंती आहे. महाराष्ट्राचे लाडके अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे तुकाराम भाऊराव साठे हे क्रांतिकारक, कथाकार, समाजसुधारक, कादंबरीकार, नाटककार, कवी, प्रयोगशील कलावंत आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्वपूर्ण लढा देणारे प्रतिभावंत लोकशाहीर होते. अण्णाभाऊंनी २१ कथासंग्रह आणि मराठी भाषेत ३५ कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांच्या या कथा-कादंबऱ्यांचे २२ परकीय भाषांत भाषांतरे झाली आहेत. अण्णाभाऊ हे पोवाडा आणि लावणीच्या माध्यमातून जनसमुदायामध्ये लोकप्रिय बनले आणि त्यांच्या या शैलीमुळे त्यांच कार्य जनतेपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. 

संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरत. अण्णाभाऊंनी त्यांच्या काही कथासंग्रहातून महिलांची पौराणिक प्रतिभा नाकारली आहे आणि महिला आणि पुरुष यांना समान पातळीवर ठेऊन  प्राधान्य दिले आहे. अण्णाभाऊ हे शाळेत शिकलेले नाहीत. शाळेत गेल्यानंतर तेथील होणाऱ्या जाती-जाती मधील भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्त्याच योगदान हे महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण ठरलेल असून देखील पण, आजच्या आधुनिक काळामध्ये जनसमुदायाला त्यांच्या बद्दल पाहिजे तेवढं माहीत नाही. का? 

आजच्या विज्ञान काळात अण्णांभाऊच्या साहित्याची दखल हवी तशी घेतली गेली जात नाही. फक्त जयंती व पुण्यतिथी निमित्तच अभिवादन केले जाते. त्यांचे साहित्य केवळ एका जाती-धर्मा पुरते मर्यादित कधीच नव्हते. आजच्या पिढीने त्यांच्या साहित्याची महिती करून घेणं तितकंच गरजेचं आहे तेव्हाच त्यांना अण्णाभाऊ कळतील.

आज त्यांना अभिवादन करताना आजच्या वर्तमान परिस्थितीत जर अण्णाभाऊ असते तर…? असा प्रश्न सहजच मनात आला. आधुनिक काळामध्ये स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहे, तरी देखील स्त्री वर अन्याय-अत्याचार होत असलेले दिसतात. आधुनिक काळ हा इतका भ्रष्ट झाला आहे की न्याय देखिल आज विकत घेतला जात आहे. आज राज्यपद्धती, धर्मनिरपेक्षता, लोकशाही या साऱ्या मूल्यांची अगदी हेळसांडच करून ठेवली आहे. नीट-नेटका राज्यकारभार, कर्तव्यदक्ष सरकार, भ्रष्टाचारविना व्यवहार, यांच कुठेही आज जतन होत असताना दिसत नाही. आज समाजामध्ये होणार शिक्षणाच व्यवहारिकरण, गुन्हेगारी, जाती-धर्मात होणार राजकारण या सर्व गोष्टी आज हळूहळू समाज पोखरत जात आहेत. आज अण्णाभाऊ असते तर त्यांनी त्यांच्या साहित्यातून अन्याय-अत्याचाराविरोधात लढा दिला असता. आज जर अण्णाभाऊ असते तर त्यांनी जातीव्यवस्था, गरीबी, शिक्षणाचं होणार बाजारीकरण, भ्रष्ट राजकारण यांची मक्तेदारी थांबवली असती. आज समजामध्ये होणाऱ्या अत्याचारांच्या घटना घडल्या नसत्या. अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात त्यांनी साहित्यातून आवाज उठवून त्याला आळा बसवून आजच्या समाजाला त्यांनी योग्य मार्गदर्शन केले असते. 

समाजामध्ये आज परिवर्तन होणे गरजेचे आहे. योग्य तिथे बदल घडवून आणून ते परिवर्तन करण्याकरता आज आपल्याला अण्णाभाऊ सारख्या थोर क्रांतीकारांनी दिलेले विचार आपल्या अंगी आणले पाहिजेत.  तरच आणि तरच आज हा समाज खऱ्या अर्थानं समृद्ध होइल..!

आज ती वेळ आलेली आहे खऱ्या अर्थाने आपण स्वतः अण्णाभाऊ बनून गुलामगिरीने जखडलेल्या बेड्या तोडण्याची. आता वेळ आली आहे आजच्या सडक्या न्याय व्यवस्थेला खडा सवाल करून समाजाला पोखरत जाणाऱ्या भ्रष्ट राजकारण्यांना धडा शिकवण्याची. त्यासाठी प्रत्येकाने  अण्णाभाऊचे विचार आपल्या मनी रुजवले पाहिजे. त्यांच्या जयंतीनिमित्त आज अण्णाभाऊंच्या कार्याला दिलेला हा उजाळा.

~ आरती इंगळे

 विभाग – मुंबई 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *