
प्रेमाची परिभाषा आणि शब्दावली अनेक जण मांडतील, पण अडीच अक्षरांच्या या ‘प्रेमात’ अनेक रूप आणि नाती जोडली जातात हे अगदी खरंय बरं का..!!
कुणाला वाटेल प्रेम म्हणलं की दुरावा, विरह, आठवणी, त्रास, त्रागा, घालमेल! पण या सगळ्या गोष्टी जरी प्रेमात येत असल्या तरी या विरहात, दुराव्यात तितकीच प्रांजळपणे नात्याची गुंफण अधिक घट्ट होत जाते, हे ही तितकंच खरं!
…प्रेम या अडीच अक्षरातच खूप मोठी जादू आहे . नाही का …?
कोमेजलेल्याला फुलविण्याची..
उदास असणाऱ्याला हसविण्याची..
खचून गेलेल्याला उभारी देण्याची..
फुलून आलेल्याच फुलण अधिक खुलविण्याची जादू या प्रेमातच आहे…
कुणाच्यातरी प्रेमात गुंतण्याहून आपण कुणावर तरी प्रेम करतोय ही भावनाच खूप गोड आहे, असं धुंद सतावणार प्रेम फक्त धुक्याआडचं लहरत रहावं.. अगदी बेधुंदपणे असं मला वाटतं…!
..प्रेम हा एक उत्सव आहे, मिटल्या पाकळ्यांचा…!
संवेदनांनी उमलू पाहणाऱ्या ज्योतीचा..!
प्रकाशमान होत जाणाऱ्या आंतरिक अवकाशाचा…!
हा केवळ एक दिवसाचा खेळ नाहीये, की वस्तूतून व्यक्त होणारा हृदयाचा मेळ ही नाही…प्रेम ही एक प्रतिज्ञा आहे,
शब्दाविना आतून उच्चारलेली,
एकमेकांच्या सोबतीन शिखरावर घेऊन जाणारी…
एक नव आत्मबळ देणारी..समजूतदार वाटेवर डोळ्यांनीच सावरणारी..तरीही नव्या आशेन चालत रहायला शिकवणारी एक सुंदरतेची आराधना म्हणजे प्रेम…! शब्दा आधीची शांतता अन शब्दानंतरची शांतता यातही अडखळलय एक नवखं प्रेम….! जस अंतराळात विरून जाणं, प्रेम समजून घेता घेता राख होऊन पुन्हा प्रेमात पडण..हीच तर प्रेमाची किमया…!
आणि अशीच शिशिराची एखादी झुळूक येते, त्यातली काही पिवळी पान म्हणजे ऋतूअखेर नसतो..ती एक नवी सुरुवात असते, ते ही शिशिरवारं निघून जात..कोवळ्या फांदीतून चैत्र पुन्हा बहरतो, झुळूक ही पुन्हा ओलावते, माती पुन्हा धुमारते….नव काही घडवण्यासाठी…! असचं असतं ना अडीच अक्षरांच प्रेम…
#अडीचअक्षरांचप्रेम❤
#Valentine_special❤
#Love_is_always_forever
– RJ Anu ( अनुजा )
विभाग – अहमदनगर